महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

‘उटण्यासंगे अभ्यंगस्नान, नक्की करा मतदान’

  • मतदान जागृतीसाठी  शिरवली शाळेचा अभिनव उपक्रम

लांजा : लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभवांतर्गत उत्पादक उपक्रमात दिवाळी सणासाठी सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा घेतली. यामध्ये नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केलेल्या सुगंधी उटण्याची निर्मिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी करुन शिरवली गावात घरोघरी जाऊन विक्री केली.

संपूर्णपणे नैसर्गिकपणे बनविलेल्या या उटण्यामध्ये नागरमोथा, कापूरकचरी, कचोरा, रानबावची , वाळा, संत्रा, आवळा, गुलाब, चंदन, मुलतानी माती, बेसन इत्यादी वनस्पती चूर्ण पावडर यांचा वापर करण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुगंधी उटण्याच्या आकर्षक वेष्टनावर मतदान जनजागृतीचे संदेश लिहिलेली पाकिटे विक्री करताना विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन ग्राहकांना करुन जनजागृती केली आहे. “उटण्यासंगे अभ्यंगस्नान.. नक्की करा मतदान.. लक्षात ठेवा २० नोव्हेंबरला आहे मतदान ,” “सण आहे दिवाळीचा, सण आहे मतदानाचा”, ” मतदानाची वाढवा टक्केवारी,हीच आहे सर्वांची जबाबदारी “, आपले मत , आपले भविष्य”, “जागरुक मतदार, लोकशाहीचा आधार ”, “देशहिताचे ठेवू भान, चला करु मतदान ” “मत आपलं द्यायचं आहे, कर्तव्य आपलं बजावायचं आहे “.. अशी विविध मतदान जनजागृतीचे संदेश लिहिलेली पाकिटे मुलांनी घरोघरी जाऊन विक्री करुन दिवाळी सणाच्या शुभेच्छांसह मतदान जनजागृतीही केली. सुगंधी उटण्याच्या निर्मिती व विक्रीसह मतदान जनजागृती करण्याच्या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री, उटण्यातील विविध औषधी वनस्पतींच्या पावडर चूर्णांचा उपयोग व अभ्यंगस्नानातील उटण्याचे महत्त्वही जाणून घेतले.

प्रशालेच्या सुगंधी उटणे निर्मिती व विक्रीद्वारे मतदान जनजागृतीच्या या अभिनव उपक्रमाचे आयोजन शिरवली शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, पदवीधर शिक्षक श्रद्धा दळवी व उमेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button