डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर
डोंबिवली (राजू नलावडे ) : रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकण भूषण, तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना डोंबिवली येथील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
डोंबिवलीत कोकण युवा प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातात. त्यानुसार यावर्षी मुंबई आणि रत्नागिरीसह कोकणात अत्याधुनिक नेत्रोपचारांची सुविधा असलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलची साखळी निर्माण करणारे डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना कोकणभूषण, तर पत्रकार प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न (पत्रकारिता) पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच कलारत्न (प्रभाकर मोरे), साहित्यरत्न (अशोक लोटणकर), समाजरत्न (सुनील कदम), शिक्षणरत्न (महेंद्र साळवी), कृषीरत्न (सचिन आणि समीर अधिकारी), क्रीडारत्न (राहुल जाधव), शौर्यरत्न (शिवाजी बने) आणि उद्योगरत्न (विशाल जाधव) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ही संस्था पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने डोंबिवली, सायक्लोथॉन सायकल स्पर्धेचे आयोजन. पूरग्रस्तांना मदतीचा हात देते. तसेच दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबविला जातो. वृक्षारोपणाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक, दूरदर्शन मालिका क्षेत्रातील सुनील बर्वे, आनंद इंगळे, भाऊ कदम, समीर चौगुले, कुशल बद्रिके इत्यादींच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाते. परंपरा, संस्कृती जपली जावी या उद्देशाने गेली सात वर्षे भजनोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी या कार्यक्रमाला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ येत्या रविवारी दि. २७ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता डोंबिवली (पश्चिम) येथील महात्मा फुले रोडवरील मराठा हितवर्धक मंडळाच्या मराठा मंदिर हॉलमध्ये होणार आहे. या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके, उपाध्यक्ष दिनेश मोरे, सचिव विराज चव्हाण आणि खजिनदार रोहन मोरे यांनी केले आहे.