परसबाग निर्मिती स्पर्धेत पिरंदवणे शाळा क्र.१ तालुकास्तरावर द्वितीय
संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे शाळा क्र. १ या शाळेने परसबाग निर्मिती स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक संपादन करून यशाला गवसणी घातली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत परसबाग निर्मिती शाळेत करण्यात यावी आणि त्याचा उपयोग शालेय पोषण आहारात व्हावा यासंदर्भात शासनाने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन केले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण व अन्य सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदतीला घेत परसबाग निर्मिती केली. यासाठी कोळंबे बीटचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे सर व डिंगणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संतोष मोहिते यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. ग्रामस्थ, पालक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवश्यक सहकार्य केले. यामध्ये गांडूळखत प्रकल्प, जीवामृत निर्मिती अशा उपक्रमांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच अधिकारी वर्गातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.