पहिल्या गणपती स्पेशल गाड्या आजच कोकणच्या दिशेने रवाना होणार!
दिवा जंक्शन वरून चिपळूण रत्नागिरीला उद्यापासून मेमू स्पेशल गाड्या
रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून कोकण रेल्वेमार्गे सोडण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत आहेत. या विशेष गाड्यांपैकी अहमदाबाद ते कुडाळ दरम्यान धावणारी पश्चिम रेल्वेची गाडी आज (मंगळवारी) तर मध्य रेल्वेची मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणारी गणपती विशेष गाडी आज मध्यरात्री कोकणच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून दरवर्षी विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षी देखील पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी शेकडो विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चिपळूण, रत्नागिरीसाठी उद्यापासून संपूर्णपणे अनारक्षित मेमू गाड्या
यंदाच्या गणेशोत्सवासाठी दिवा त्याचे पण दरम्यान धावणारी मेमू गाडी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी चिपळूण साठी रवाना होणार आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवात प्रथमच रत्नागिरी पर्यंत मेमू स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही गाडी देखील उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा पहिला जत्था घेऊन रत्नागिरीच्या दिशेने रवाना होणार आहे. या गाड्या पूर्णपणे अनारक्षित आहेत. कन्फर्म तिकीट न मिळालेल्या आणि आयत्यावेळी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या फायदेशीर ठरणार आहेत.
गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी गुजरातमधील अहमदाबाद ते सिंधुदुर्गमध्ये कुडाळस्थानकापर्यंत धावणारी पहिली गाडी (09412) आजच दुपारी कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रवाना होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आज दि. 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर मुंबई ते सावंतवाडी (01171) ही मध्य रेल्वेची पहिली विशेष गाडी कुडाळकडे येण्यासाठी रवाना होणार आहे.