लांजातील कुणबी विकास सह. पतसंस्थेचा सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या दीपस्तंभ पुरस्काराने सन्मान !
लांजा : रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेली लांजा तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अत्यंत मानाच्या अशा सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या दीपस्तंभ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. कॉसमॉस को-ऑप बँक लि.चे अध्यक्ष व नॅफकॅब, दिल्लीचे उपाध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्थापनेपासून सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच लांजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपला नावलौकिक मिळवला आहे. संस्थेने आपला संपूर्ण कारभार हा संगणीकृत केला असून सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जातो. तर प्रभावी वसुली यंत्रणेमुळे संस्थेने नेहमीच आपली कर्जवसुली वेळेत करताना ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. संस्थेच्या या एकूणच कामगिरीची दाखल घेत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने केलेल्या चार गटांपैकी ५० ते १०० कोटी ठेवींच्या गटातून कुणबी विकास पतसंस्थेची राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड केली होती.
हा पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच हैदराबाद रामोजी फिल्मसिटी येथील एका शानदार कार्यक्रमात पार पडला. या सोहळ्यात पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी, संचालक नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे यांनी कॉसमॉस को-ऑप बँक लि.चे अध्यक्ष व नॅफकॅब, दिल्लीचे उपाध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तसेच पतसंस्था फेडरेशनचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते. याबरोबर राज्यभरातून आलेले सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व संचालक उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनीही कुणबी विकास पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा असून संस्थेने लांजा, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, राजापूर, दापोली व गुहागर येथे सात शाखा सुरु केल्या असून पतसंस्था आपले कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे. संस्थेस सतत “ अ ” वर्ग प्राप्त झाला आहे, संस्था सातत्याने नफ्यात आहे, व्यवसाय वृद्धी, सीडी रेशो, एनपीए, कर्ज वसुली यांचे आदर्श प्रमाण संस्थेने राखले आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना उत्तम प्रकारे सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. यामुळे सभासदांची विश्वासाहर्ता वाढली आहे. संस्थेची व्यवसायातील वाढ, ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी तसेच संस्थेचे स्थानिक शाखा कमिटी सदस्य यांचे उत्कृष्ट सहकार्य यामुळे हे साध्य झाले आहे. या सर्वांसाठी साथ देणारे संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी मानले.
दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून कुणबी विकास पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे