हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रत्नागिरीत रक्तदानासह विविध कार्यक्रम

रत्नागिरी : हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून ज्या समाज कार्यासाठी शिवसेनेची खरी ओळख आहे ते म्हणजे रक्तदान शिबीरही या निमित्ताने घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना शहर संघटक तथा युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. तत्पूर्वी सकाळी शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे तसेच माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर
सकाळी १०.३० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे फळवाटप करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता माजी आमदार राजन साळवी यांचे संपर्क कार्यालय आठवडा बाजार येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त महाप्रसाद असून त्यानंतर माजी आमदार साळवी यांच्या संपर्क कार्यालयातच सायंकाळी ४ वाजता हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी ६ वाजता याच ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना, रिक्षा सेना, विधी सेना आणि महिला आघाडी यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.