ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजीहेल्थ कॉर्नर

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील पहिले वातानुकुलित महाविद्यालय


तीन वर्षानंतर ‘पीजी’ अभ्यासक्रमही सुरु करणार : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि.६ : रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेले विद्यार्थी हे भाग्यवान आहेत. कारण, 522 कोटींचे हे महाविद्यालय राज्यातील पहिले वातानुकुलित महाविद्यालय आहे. ज्याप्रमाणे या महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे, त्याचप्रमाणे 3 वर्षानंतर या महाविद्यालयात ‘पीजी’ अभ्यासक्रम सुरु केला जाईल, असा मनोदय पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखविला.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू, गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, डॉ. अलिमियॉं परकार, अण्णा सामंत, डॉ. नितीन चव्हाण, डॉ. अमोल पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, अभिजीत हेगशेट्ये, अरविंद कोकजे, मुन्ना सुर्वे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, राज्यमंत्री झाल्यावर शहरातील काही डॉक्टरांच्याबरोबर चर्चा करुन रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आणून वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. ज्यावेळी त्याबाबतचा अभ्यास केला त्यावेळी समजले, निम्या परवानग्या केंद्र शासनाच्या लागतात. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून काम करतानाही हेच मिशन राबवून सिंधुदुर्ग मध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि विमानतळ सुरु करुन घेतलं.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न सांगितल्यानंतर रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या 522 कोटींच्या प्रस्तावाला त्यांनी त्यांनी मंजुरी दिली. केंद्र शासनाच्या परवानग्यांसाठीही मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. प्रत्यक्षात हे महाविद्यालय सुरु झाले असून, राज्यातील 85 तर परराज्यातील 15 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ही बॅच पायोनिअर म्हणून ओळखली जाईल. या स्वप्नपूर्तीनंतर 3 वर्षानंतर याच ठिकाणी ‘पीजी’ सुरु केले जाईल. काही दिवसात शासकीय रुग्णालय देखील अधिष्ठातांच्या ताब्यात दिले जाईल. राज्यातील आदर्श सिव्हील हॉस्पीटल कुठलं, तर ते रत्नागिरीचे, असे सांगण्याची संधी डॉ. रामानंद यांनी द्यावी, असेही ते म्हणाले.


येणाऱ्या काळात हे महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य महाविद्यालय असेल, अशी ग्वाही अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. रत्नागिरीकरांचे 50 वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून, या महाविद्यालयाच्या निमित्ताने भवताल देखील विकसित होणार असल्याचे श्री. हेगशेट्ये म्हणाले. या महाविद्यालयामुळे आरोग्य यंत्रणेला चालना मिळणार असल्याचे मनोगत डॉ. परकार यांनी व्यक्त केले. प्रथम वर्षाचा विद्यार्थी वेदांत भट आणि विद्यार्थिनी देविशी श्रीवास्तव यांनीही भावना व्यक्त केल्या.
शेवटी डॉ. शैलेश गावंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button