जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे गांधी जयंती उत्साहात साजरी
उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिरकोन गावचे समाजसेवक विलास गावंड यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. तसेच महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शिक्षक-पालक संघटनेच्या सदस्या प्रणाली पाटील व मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे उपस्थित होते.
इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल हे भारतातील दोनच व्यक्तीमत्त्वाना घाबरत होते ते म्हणजे महात्मा गांधी व सरदार वल्लभाई पटेल. कारण या दोघांमध्ये नितीमत्ता होती. आए.ए.एस. अधिकारी जेव्हा भारतात येत तेव्हा विस्टन चर्चिल यांना म्हणत की गांधी व पटेल यांच्या समोर काही बोलू नका कारण हे दोन्ही व्यक्तीमत्त्व पहिले सही करून घेत व नंतर मजकूर लिहित. प्रत्येक विद्यार्थ्याने महात्मा गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग व साने गुरुजींनी लिहिलेले श्यामची आई ही दोन पुस्तके वाचली पाहिजे व प्रत्येकाच्या संग्रही असावी असे मत संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधीजींच्या जीवनावर समर म्हात्रे, आरोही म्हात्रे, स्वरा पाटील, ध्वेन म्हात्रे, मौर्य गावंड, कौस्तुभ म्हात्रे, आस्था गावंड व श्रेया गावंड यांनी भाषणे केली. यावेळी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी आवरे गावात पदयात्रा काढली.या पदयात्रेत ४५ विद्यार्थ्यांनी गांधीजीची वेशभूषा केली. इ. ६ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाटय सादर केले. या पथनाट्यात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे निवेदन प्राजक्ता नाईक यांनी केले.