उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

रत्नागिरीच्या हापूस आंब्याने दिल्लीत पटकावले सुवर्णपदक!

  • ‘एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
  • राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक
  • कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

नवी दिल्ली, 15 : एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.
सोमवारी येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) 2024 पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे. या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला, ज्यामुळे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यानेही सुवर्णपदक मिळवले आहे. राज्याच्यावतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे यश
महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आपली आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे. या अंतर्गत खालील जिल्‌ह्याना आपल्या वैशिष्ट्पूर्ण कृषी उत्पादनांसाठी पुरस्कार पटवावले :

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक

जागतिक स्तरावर ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.

नागपूरी संत्र्यांना रौप्यपदक

नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.

अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक

अमरावती जिल्ह्याने आपल्या मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावतीने हे यश संपादन केले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्यपदकाचा पुरस्कार स्वीकारला.

नाशिकच्या द्राक्षे आणि मनुकांना विशेष उल्लेख पुरस्कार

नाशिकने आपल्या द्राक्षे आणि मनुकांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी अ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे, आणि या यशाने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.

गैर-कृषी क्षेत्रातील यश

अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button