यशश्री शिंदे हिच्या अमाननूष हत्ये प्रकरणी उरणच्या जनतेचा निषेध मोर्चा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या घटनेचा उरणमधील सर्व पक्षीय नागरिकांनी मोर्चा काढून निषेध केला. या क्रूर घटनेप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावीयासह उरणमध्ये महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे प्रकार थांबवावे या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
उरणमध्ये यशश्री शिंदे ही २२ वर्षाची युवती हरविल्याची तक्रार गुरुवार दिनांक २५/७/२०२४ रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्या मार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरु होता. मात्र शुक्रवारी दिनांक २६/७/२०२४ रोजी सदर तरुणीचा मृतदेह उरण मधील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ येथे सापडला. या तरुणीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. सदर तरुणीचा पोस्मार्टम केल्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्त्या केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. उरण मध्ये यशश्री शिंदे वय २२ या युवतीचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
आम्ही उरण मधील कोणीही वकील आरोपीची केस लढविणार नाही. यशश्री शिंदे हिला न्याय मिळाला पाहिजे. व दोषी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही उरण मधील सर्व वकील यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपण उभे आहोत. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देणारच
– रत्नदीप पाटील, उरण मधील प्रसिद्ध वकील.
अतिशय क्रूरपणे शरीरावर धार धार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण उरण मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रकरणाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. आरोपी सापडले नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेक झाला. सर्वच राजकीय पक्षांनी, विविध सामाजिक संस्था संघटनानी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा, मोरा रोड उरण शहर येथे निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य एकत्र आले होते. सर्वांनी एकत्र येत यशश्री शिंदे हत्त्या घटनेचा निषेध केला. संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. उरण मध्ये महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे प्रकार थांबवावे या प्रमुख मागणीसाठी उरण मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा उरण शहरातील गांधी पुतळा ते राजपाल नाका, चारफाटा, चारफाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन अशा मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुष वर्ग, युवा वर्ग यांच्यासोबत महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता.
उरण हे शांततेचे प्रतीक आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे उरणचे वातावरण प्रदूषित होत आहे. अनेक वर्षांपासून आम्ही उरण मध्ये सर्वच जाती धर्माचे लोक शांततेने राहतो. एकमेकांच्या कार्यक्रमात जातो. आमच्यात एकी आहे. मात्र बाहेरून उरण मध्ये कामाला येणारे व्यक्ती वाईट कृत्य, वाईट गोष्टी करत आहेत.बाहेरचे व्यक्ती उरणला गालबोट लावत आहेत.त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आम्ही उरण पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.
समद शफी मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते
महिला सुद्धा यावेळी आक्रमक झाल्या होत्या. सदर निंदनीय घटनेचा निषेध म्हणून उरण मधील सर्व व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी उरणच्या व्यापारांनी कडकडीत बंद पाळून यशश्री शिंदेच्या हत्तेचा निषेध केला.
आरोपीला त्वरित पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. काँग्रेस पक्षाने नेहमी अन्याया विरोधात आवाज उठविला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.
– महेंद्र घरत, रायगड जिल्हाध्यक्ष काँग्रेस.
या प्रकरणी संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला. यावेळी मोर्चेकरांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा उपस्थित उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांनी जनतेला शांततेतेचे आवाहन केले. आरोपीचा शोध सुरु असून कोणत्याही अफ़वा वर विश्वास ठेवू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांनी यावेळी सांगितले. संतप्त नागरिकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र आरोपीला पकडले नाही तसेच कठोर कारवाई केली नाही तर उरण मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मोर्चातील संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
उरणमध्ये शांतता आहे. सर्वधर्म समभाव व एकोपाने आम्ही उरणचे नागरिक राहतो. मात्र कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवत असेल तर त्या गोष्टीचे आम्ही समर्थन करणार नाही. चुकीच्या गोष्टीना आमचा नेहमी विरोध असेल. उरण मध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाणे राहत आहेत. आणि पुढेही राहू, यशश्री शिंदे प्रकरणातील सदर आरोपीला, दोषीला फाशीची शिक्षा व्हावी.
– सईम शेख, ग्रामस्थ उरण.
विद्यमान आमदार महेश बालदी,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,राष्ट्रवादीचे महिला नेत्या भावना घाणेकर, राष्ट्रवादीचे नेते तथा कामगार नेते संतोष घरत, गणेश नलावडे, भाजपचे महिला नेत्या चित्रा वाघ, शेतकरी कामगार पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत,काँग्रेस पक्षाचे उरण तालुका अध्यक्षा रेखा घरत, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, लोकजनशक्ती पक्षाचे संतोष पवार, भाजपचे रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर,महिला जनवादी संघटनेचे हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी, विविध महिला संघटनेचे पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांची भेट घेउन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.
यशश्री शिंदेच्या मारेकऱ्यांचे शोध सुरु आहे. आरोपी अजूनही सापडला नाही.आरोपी सापडल्यास त्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करू. जनतेने आम्हाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देऊ.
– विशाल नेहूल. सहाय्यक पोलीस आयुक्त. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय.
उरण मध्ये महिलांना कोणतेही संरक्षण नाही. महिला कुठेही सुरक्षितपणे फिरू शकत नाही. महिलांना सर्वात अगोदर संरक्षण दया. उरण मध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावा. महिलांच्या अत्याचार, बलात्कार संबंधित सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, कोणतेही स्त्री पोलीस स्टेशन मध्ये गेल्यास त्या स्त्रीची त्वरित तक्रार नोंदवून घ्यावी व लगेच तपास सुरु करावा. यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
– प्रिया शाह, महिला सामाजिक कार्यकर्त्या, उरण.