स्वच्छता हिच सेवा जनजागृतीसाठी दापोलीत उद्या सायकल फेरी
दापोली : स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम राबवत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब, संतोषभाई मेहता फाऊंडेशन व ज्ञानदीप दापोलीतर्फे रविवारी, १ ऑक्टोबर २०२३ रोजी दिवंगत संतोषभाई फुलचंद मेहता यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्ताने सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती केळस्कर नाका, एसटी आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, ज्ञानदीप शाळा अशा ५ किमी मार्गावर असेल. या सायकल फेरीत ज्ञानदीपच्या अध्यक्षा सरोज मेहता, नगराध्यक्षा ममता मोरे, तहसीलदार अर्चना बोंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच लायन्स क्लब, जेसीआय दापोली, रोटरी क्लब यांचे पदाधिकारीही सायकल चालवत सहभागी होणार आहेत. या सायकल फेरीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात येईल. स्वच्छता, साफसफाई श्रमदान केले जाईल.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८३०८३६६३६६ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात.
सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.