साहित्य-कला-संस्कृती

संगमेश्वरमध्ये रंगला कर्णेश्वर महोत्सव!

स्कंधा चितळे यांच्या कथ्थक नृत्याने रसिक मंत्रमुग्ध

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील चालुक्य राजवटीत उभारण्यात आलेले कर्णेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत ठेवा समजला जातोयाच मंदिराच्या प्रांगणात 'कलांगण' संस्थेतर्फे विविध कलांच्या सादरीकरणाचा अनोखा संगम घडवून आणण्यात आला. चिपळूण येथील स्कंधा गानू चितळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सादर केलेले कथ्थक नृत्य पाहून उपस्थित शेकडो रसिक केवळ भारावले नाहीत, तर मंत्रमुग्ध देखील झाले.

वृंदावनी वेणू या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने तर रसिकवर्ग कमालीचा खूष झाला. कथ्थक नृत्य सादरीकरणा दरम्यान नृत्य प्रकारांची सारी माहिती सांगितल्यामुळे रसिकांना नृत्य कळले आणि भावले देखील. कसबा या गावातील कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात आजवर महाशिवरात्री उत्सवा दरम्यान होणारे कीर्तन आणि नाटक या व्यतिरिक्त अन्य कला सादर करण्याचा कार्यक्रम कधीही संपन्न झाला नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या कलांगण संस्थेने कर्णेश्वर मंदिरात तीन दिवसांचा आगळावेगळा कला महोत्सव आयोजित करुन संगमेश्वर तालुक्यातीलच नव्हे तर, जिल्ह्यातील कलारसिकांना एक उत्तम संधी उपलब्ध करुन दिली. श्रृती भावे यांचे व्हायोलिन वादन, स्कंधा गानू चितळे यांचे कथ्थक नृत्य आणि आफळे बुवा यांचे गायन असा त्रिवेणी कलांचा संगमच कलांगणने घडवून आणला. अशा प्रकारचा कला संगीत महोत्सव प्रथमच आयोजित करुनही कलांगणने हे शिवधनुष्य लिलया पेलले. रसिकांनी देखील या महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद दिला. कर्णेश्वर मंदिराला केलेली भव्य दिव्य विद्युत रोषणाईने रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले. कला संगीत महोत्सवासाठी असणारी साऊंड सिस्टीम कर्णमधुर होती. हा महोत्सव संपूच नये असे रसिकांना वाटले हेच कलांगण संस्थेचे मोठे यश आहे. कथ्थक नृत्यांगना स्कंधा गानू चितळे या मूळ देवरुखच्या. शिल्पा भिडे मुंगळे यांच्याकडे त्यांनी कथ्थक नृत्याचे अनेक वर्षे शिक्षण घेतले. विवाहानंतर चिपळूण येथे त्यांनी कथ्थक नृत्याचे वर्ग सुरु केले. कर्णेश्वर कला संगीत महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने स्कंधा यांनी कलांगणचे मनस्वी आभार मानले. कथ्थक नृत्य कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी स्कंधा चितळे यांनी आपल्या गुरु शिल्पा भिडे मुंगळे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आपल्या सहकलाकारांची उपस्थित रसिकांना ओळख करुन दिली.

ग्रामीण भागात कथ्थक नृत्य प्रकार हा तसा नवीन असल्याने उपस्थित रसिकांना नृत्यातील प्रत्येक प्रकार कळावा यासाठी नृत्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती दिल्याने रसिकांना नृत्याचा आस्वाद घेणे अधिक सोपे झाले. कथ्थक नृत्य म्हणजे वेगवान आणि सतत हालचाल, असे असताना देखील त्यांनी नृत्याचे प्रकार समजावून सांगितले याचे रसिकांना विशेष कौतूक वाटले. कलादर्पण या त्यांच्या कथ्थक नृत्यात सहा नृत्य कलाकार सहकारी उपस्थित होत्या. गत, तोडे तिहाई हे सारे नृत्य प्रकार समजावून देताना नृत्यकलाकारांची अक्षरशः दमछाक होत होती, तरीही त्यांनी नृत्य करताना मध्येच याची सर्व शास्त्रीय माहिती उपस्थितांना दिली याचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ कर्णेश्वरांच्या दरबारात या कथ्थक नृत्यांवर स्कंधा चितळे आणि त्यांच्या सहकलाकारांची पावले थिरकत होती. कार्यक्रमाच्या अखेरीस अजित कडकडे यांनी गायलेल्या वृंदावनी वेणू ....... या जवळपास पाच मिनीटांच्या गाण्यावर तर या नृत्य कलाकारांनी देहभान हरपून नृत्यकलेचा जो आविष्कार सादर केला तो रसिक प्रेक्षकांना अचंबित करणारा ठरला. या नृत्याला जो टाळ्यांचा गजर सुरु झाला तो थांबतच नव्हता. अशावेळी उत्साही रसिकांनी वन्समोअरची मागणी केली. खरंतर अडीचतास नृत्य करुन सारे कलाकार थकले होते. मात्र रसिक प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण केली नाही तर, तो कलाकार कसला ? हे समजून घेत याच पूर्ण गाण्यावर परत एकदा सलग पाच मिनीटे स्कंधा आणि सहकलाकारांनी नृत्य सादर करुन रसिक प्रेक्षकांसाठी हा दिवस यादगार बनविला. टाळ्यांच्या कडकडाटातच कलादर्पणच्या कथ्थक नृत्य कार्यक्रमाची सांगता झाली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button