अतिरिक्त विद्युत दाबामुळे लांजात उपकरणे जळून लाखोंचे नुकसान
लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथे अतिरिक्त विजेचा दाब आल्याने येथील 15 घरांमधील वीज उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे.
तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथील ट्रांसफार्मरची न्यूट्रल केबलही जळालल्याने अतिरिक्त विद्युत पुरवठा आल्याने प्रवीण जाधव विजय जाधव सदानंद जाधव मनोहर सावंत मंगला लोटणकर, रामचंद्र मिस्त्री, राजेंद्र मिस्त्री, सुरेंद्र ब्रीद, रामदास सावंत, परशुराम जाधव, संतोष लोटणकर, रवींद्र लोटणकर यांच्या घरातील फ्रिज, टीव्ही ही उपकरणे जळून गेली. या घटनेनंतर तेथील विद्युत प्रवाह खंडित झाला असून या घटनेची खबर लांजा महावितरण विभागाला देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वायरमन अंकुश कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. तलाठी श्री कांबळे यांना या घटनेची खबर देण्यात आली होती. पंचनामा झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे वीज उपकरणाचे नुकसान झाले आहे. ज्यांच्याकडे खरेदीची पावती असेल अशा लोकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास महावितरणकडून नुकसान भरपाई मिळू शकते. या बाबत महावितरण उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.