महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. २२ : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात दापोली, खेड, आणि मंडणगड तालुक्याचा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज झाला. यावेळी आमदार योगेश कदम, प्रातांधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते.

रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, या योजनेपासून एकही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही. असा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर जावून शुभारंभाच्या निमित्ताने संवाद साधतोय. ही योजना कधीही बंद होणार नाही. अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात जीवावर उदार होवून केलेले काम कौतुकास्पद आहे. या योजनेचा लाभही अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक अर्ज ऑनलाईन अपलोड केल्यानंतर पन्नास रुपये देखील त्यांना मिळणार आहेत. महिला भगिनींच्या घरच्या आर्थिक नियोजनाला राज्य सरकारने देखील या योजनेच्या माध्यमातून हातभार लावला आहे. महिलांनी लेक लाडकी, शुभमंगल योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना अशा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

राज्यात प्रथमच अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, कोतवाल यांच्यासाठी वैयक्तिक लाभाची योजना नियोजन मंडळातून करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहोत असेही पालकमंत्री म्हणाले.

आमदार श्री. कदम म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली आहे अशी टिका झाली. परंतु, मुख्यमंत्री महोदयांनी महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. एस.टी. प्रवासात पन्नास टक्के सवलत, बचतगटांना तीस हजाराचे अर्थसहाय्य असे निर्णय घेतलेले आहेत. याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थलांतरित कुटूंबांना किट वाटप तसेच लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button