अर्थक्रांती आणणारा अर्थसंकल्प : उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची निश्चित दिशा देण्याच्या दृष्टीकोनातून पहिला अर्थसंकल्प आपल्याला दिला आहे. रोजगार निर्मिती, उद्योजकता वाढीस लागावी म्हणून ठोस उपाययोजना, आयकरात मोठे बदल घडवून देशातील करदात्यांना मोठा दिलासा, देशातील तरूणांच्या कौशल्य विकासासाठी इंटर्नशीप कार्यक्रम, महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना, कँसर सारख्या आजारावरील औषधांवरची कस्टम ड्युटी रद्द करणे, सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करणे अशा महत्वाच्या बाबींचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
ना. सामंत यांनी या अर्थसंकल्पाबाबत पुढे म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शेती, रोजगार निर्मीती – कौशल्य विकास, मानव संसाधनांचा विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा क्षेत्राला बूस्ट, नगर विकास, उर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, इनोवेशन आणि संशोधन – विकास, याच बरोबरीनी पुढच्या पिढीसाठी एक सक्षम देश देण्यासाठी उपाययोजना अशा नऊ क्षेत्रांना प्राथमिकता देऊन अर्थसुधारणा आणणारा हा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पाचं मी मनापासून स्वागत करतो. या अर्थसंकल्पामुळे देश एका नव्या उंचीवर पोहोचेल यात माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही केंद्राच्या अर्थ संकल्पा बाबत त्यांनी म्हटले आहे.