पंधराशे रुपयांसाठी सतराशे फेऱ्या माराव्या लागणार?
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता मिळवता महिलांची दमछाक!
रत्नागिरी : अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न नसलेल्या महिलांना आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी आधी कागदपत्रांची जमवाजमाव करताना आणि आता ऑनलाइन- ऑफलाइन अर्जांसाठी हेलपाटे मारताना ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या’ बहिणींची दमछाक होताना दिसत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनेक महिलांनी ऑफलाईन अर्ज देखील दाखल केले आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्यांना आता पुन्हा तीच कागदपत्रे घेऊन अंगणवाडी शोधण्याची वेळ आली आहे.
त्या त्या ठिकाणच्या महिलांना ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्यांनी त्यांची कागदपत्रे घेऊन जवळच्या अंगणवाड्यांमध्ये येण्यासाठी सांगितले जात आहे.
दरम्यान, जर अंगणवाड्यांमध्ये जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करायचे होते तर ऑनलाइनचा खटाटोप कशासाठी, असा सवाल आता या योजनेसाठी अर्ज भरता भरता दमलेल्या ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीं’कडून विचारला जात आहे.
या योजनेसाठी आधी कागदपत्रे जमा करता करता दमछाक झाली. आता ऑनलाइन अर्ज भरून झालेल्या महिलांना पुन्हा अंगणवाड्यांमध्ये बोलावले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेतून पंधराशे मिळवण्यासाठी सतराशे फेऱ्या मारायव्या लागणार नाहीत ना, असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.