नानासाहेब शेट्ये यांनी समाजाला सत्याचा मार्ग दाखवला : आर. डी. सामंत
- कै. नानासाहेब शेट्ये यांचा स्मृतिदिन संपन्न
- व्यक्ती, संस्था पुरस्काररांचे वितरण
संगमेश्वर दि. १ : उद्योजक बनण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. नोकरी मिळेल याच आशेवर न राहता या योजनांची माहिती घेऊन विद्यार्थी आणि तरुणांनी आपली भावी वाटचाल करावी. नानासाहेब शेट्ये यांनी समाजाला सत्याचा मार्ग दाखवला, या मार्गाने गेल्यास नक्कीच जीवनाचे सार्थक होईल असा विश्वास उद्योजक आर. डी. सामंत यांनी व्यक्त केला.
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कै. नानासाहेब शेट्ये यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव आणि पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आर. डी. सामंत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष बापू शेट्ये, रमाकांत शेट्ये, माजी प्राचार्य आणि विचारवंत डॉ. सुरेश जोशी, सदानंद भोसले, प्रा. विनायक होमकळस , सावित्री होमकळस, प्रा. आबा सावंत , युयूत्सु आर्ते, उपसरपंच ओंकार कोलते, माजी प.स.सदस्य संजय कांबळे, दीपक जाधव, नाना मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात गणपत शिर्के यांनी नानासाहेब शेट्ये स्मारक समितीच्या कार्याचा आढावा घेतला. आज ३१ व्या स्मृतिदिनी सलग पंचवीस वर्षें समितीच्या वतीने व्यक्ती आणि संस्था पुरस्कार दिला जातो अशी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. मुंबई अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते खेड तालुक्यातील सदानंद भोसले यांना उद्योजक आर.डी.सामंत यांच्या हस्ते सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात सदानंद भोसले यांनी मुंबई अग्निशमन दलातील सेवेचे अनुभव कथन केले. क्रीडाक्षेत्र व अन्य कोणतेही क्षेत्र असो जिद्द चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन करून भोसले यांनी स्मारक समितीला धन्यवाद दिले.
चिपळूण येथील गांधी प्रतिष्ठान या संस्थेला यावर्षीचा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.विनायक होमकळस, सावित्री होमकळस आणि प्रतिष्ठानच्या सात सदस्यांनी माजी प्राचार्य सुरेश जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रतिष्ठानच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रा. विनायक होमकळस म्हणाले की, अशा कार्यक्रमातून विचार ऐकणे ही विद्यार्थ्यांना एक मोठी संधी असते. गांधी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांना ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतात. अहिंसा हे गांधींनी शस्त्र म्हणून वापरलं. चिपळूणच्या गांधी प्रतिष्ठान विषयी त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. चिपळूण येथील गांधारेश्वर मंदिर परिसरात असलेला गांधींचा रक्षा कलश हा कोकणातील एकमेव कलश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. गांधी प्रतिष्ठानला सन्मानित केल्याबद्दल त्यांनी नानासाहेब शेट्ये समितीला धन्यवाद दिले.
सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी आपल्या मनोगतात, गेली पंचवीस वर्षे पुरस्कार वितरणात समितीचे असलेले सातत्य अभिनंदन असल्याचे नमूद केले. याबरोबरच देवरुख येथे साने गुरुजी यांचे स्मारक व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली. रमाकांत शेट्ये यांनी कुटुंबीयांच्या वतीने आपले विचार व्यक्त करताना नानांच्या अनेक आठवणीत सांगितल्या. नाना आमचे वडील असले, तरी ते आमच्या जवळ नेहमी मित्रासारखे वागले परिणामी समाजात कसे वागावे याची शिकवण आम्हाला त्यांच्याकडून मिळाली, असे शेट्ये यांनी नमूद केले.
लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश जोशी यांनी आपल्या मनोगतात बापू शेट्ये यांच्याबरोबर असलेली माणसे आरशासारखे आहेत असे नमूद केले. साखरपा आता खूप बदलतंय, नाना शेट्ये यांनी, मी प्रथम साखरप्यात आलो त्यावेळी मला खोबऱ्याची वडी दिली होती, या वडीचा गोडवा आज आपल्याला साखरप्यात अनुभवायला मिळतोय , असे सांगून जोशी यांनी साखरप्यात वाचनालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश उर्फ बापू शेट्ये यांनी यावेळी बोलताना समिती हा पुरस्कार अत्यंत पारदर्शकपणे देत असल्याचे नमूद केले. आता समाजकार्यासाठी वेळ देणारी माणसं कमी झाली असल्याने त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली. समिती हा कार्यक्रम असाच अखंडपणे यापुढे सुरू ठेवेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. उद्योजक अण्णा सामंत आणि नानासाहेब शेट्ये यांचे खूप जवळचे संबंध होते असे शेटे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के आणि आभार प्रदर्शन रमाकांत शिंदे यांनी केले.