Mumbai-Goa highway | गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा हायवेची पाहणी करावी
कोकण विकास समितीकडून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आदेश देऊनही त्याची पूर्तता न झाल्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाचा पाहणी दौरा करावा, अशी मागणी कोकण विकास समितीने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोकण विकास समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्र्यांसह कोकणातील खासदारांना पाठवण्यात आल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सतत पाठपुरावा करणाऱ्या कोकण विकास समितीने म्हटले की, आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविणे तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य अक्षय मधुकर महापदी तसेच सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेल्या पाहणीत तसेच सोबतच्या फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले.
एकंदरित मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.