५२ हजार कोटींची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल : उद्योग मंत्री उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर दि.१२ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा शाश्वत विकासाची आर्थिक क्रांती घडवेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
चिकलठाणा मसिआ रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मसिआमार्फत करण्यात आले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर,सह कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, पोलीस आयुक्त किरण पवार, पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, एथर एनर्जी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रतो कुमार मित्रा, टोयाटो किर्लोस्कर उद्योग समूहाचे उप व्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश मारू. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रकल्प व्यवस्थापक बीभू नंदा. लुब्रिझॉलचे प्रतिनिधी नितीन मेनगी यांच्यासह मराठवाड्यातील विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की मराठवाड्यामध्ये एथर एनर्जी, लुब्रिजॉल, जेएसब्ल्यू ,टोयाटो किर्लोस्कर यासारख्या उद्योग समुहांनी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शाश्वत विकास करण्याबरोबरच आर्थिक क्रांती घडवणारी ठरेल. लघुउद्योगास प्रोत्साहन यामुळे मिळेल. तसेच प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होतील.तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पूरक उद्योग विकासाला चालना मिळेल.
श्री. सामंत पुढे म्हणाले की, उद्योगासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी शासन घेत आहे. राज्याच्या या धोरणांमुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत मसीआ या उद्योग संस्थेच्या मार्फत मंत्री उदय सामंत व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. मानपत्र देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी क्रिकेटच्या स्टेडियमसाठी एमआयडीसीची जागा देण्याची मागणी केली असता लवकरच या जागेत बाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
प्रास्ताविकामध्ये मसीआचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी केले. सुत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.