बँक अकाउंट दिले एक…पैसे आले भलत्याच खात्यावर!
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेले दोन महिने मोठ्या खटपटी करून कागदपत्रांची जमवाजमव करीत प्रस्ताव सादर केलेल्या अनेक महिलांचे दोन हप्त्यांचे 3000 रुपये हे त्यांनी दिलेल्या बँक खात्या व्यतिरिक्त दुसऱ्याच खात्यात जमा झाले असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. मात्र असे असले तरी पैसे मिळाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील हजारो महिलांनी अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत ऑफलाईन तर काही महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. पात्र महिलांना राज्य शासनाने सांगितल्यानुसार जुलै ऑगस्ट 2024 असे तीन हजार रुपये इतके दोन हप्त्यांचे पैसे दिनांक 14 ऑगस्टपासून खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
शेकडो महिलांना आले आधार लिंक नसल्याचे मेसेज!
या योजनेच्या लाभार्थ्यांना दिनांक 14 ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांचे पैसे त्यांनी दिलेल्या खात्यावर जमा झाले. मात्र, केवायसी अपडेट करायची राहिलेली खाती तसेच सद्यस्थितीत आधार अपडेट दाखवत नसलेली बँक खाती अशा अडचणी असलेल्या महिलांना त्यांनी त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी तत्काळ जोडण्याचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. हा मेसेज आल्यानंतर महिलांनी आपापल्या बँकांमध्ये आधार क्रमांक खात्याला संलग्न करण्यासाठी गर्दी केली आहे.
पैसे आले दुसऱ्याच खात्यावर!
लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिलांचे पैसे अशा अकाउंटला जमा झाले आहेत की, त्यांना ते वापरत नसल्याने, देवघेव करत नसल्याने, खाते माहित देखील नाही. आधार अपडेट असलेल्या बँक खात्यावरच हे पैसे पाठवले जात असल्यामुळे अनेक महिलांच्या बाबतीत असे झाले आहे की, त्यांनी अर्ज दिलेली बँक एक होती तर पैसे आलेली बँक नेमकी कुठली हे त्यांना शोधावे लागत आहे. यामध्ये असे निदर्शनास आले आहे की, काही महिलांचे पैसे हे त्यांच्या पोस्टाच्या खात्यात देखील जमा झाले आहेत तर काही महिला अशा सांगत आहेत की, मी दिला होता स्टेट बँकेचा नंबर पण पैसे आलेत बँक ऑफ बडोदामध्ये!.
अडचणींची शर्यत संपल्या संपेना!
लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर महिलांना प्रत्यक्षात पैसे येऊ लागल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला असतानाच नको असलेल्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्यामुळे त्यांना आता नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये काही महिलांची बँक खाती अशी आहेत की, त्यांनी त्यांच्या छोट्या-मोठ्या कर्जाचा हप्ता ऑटो डेबिट पडण्यासाठी जो खाते क्रमांक दिला आहे त्यावर पैसे जमा झाल्यामुळे काही गरजवंत महिला त्यांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढू शकत नाहीत. त्याचे कारण हे आहे की, ज्यांचा कर्जाचा ईएमआय कापून जाणार आहे आणि तो जर ड्यू झाला आहे तर बँक खात्यावर तीन हजार रुपये बँक जमा होऊन सुद्धा ते काढता येऊ शकत नाही. यामध्ये काही महिला अशाही आढळून आल्या की, त्यांच्या कर्जाचा हप्ता सहा ते सात हजार रुपये आहे तो ड्यू दाखवत असल्यामुळ्ये आलेल्या तीन हजार रुपयांमध्ये तीन ते चार हजार रुपये अजून भरल्यानंतर हप्ता कापून जाऊ शकणार आहे. त्यामुळे ज्या उत्साहाने महिलांनी जे बँक खाते क्रमांक दिले होते लाभाची रक्कम जमा न झालेल्या महिलांमध्ये नाराजी जाणवत आहे.
आधार अपडेट करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी!
मागील एक दोन दिवसांपासून महिला बँकांमध्ये गर्दी करत आहेत. अनेकांना असे वाटत आहे की महिला पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात यातील अनेक महिला या योजनेचे पैसे न आलेल्या व आधार अपडेट करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करून असलेल्या पाहायला मिळाल्या. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थी बँकांमध्ये पोहोचल्याने बँक वाले अशा महिलांचे आधार क्रमांक तत्काळ अपडेट करण्याऐवजी त्यांच्याकडून तसे फॉर्म भरून घेत महिलांना घरी पाठवत आहेत. त्यामुळे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला की नाही, हे पाहण्यासाठी महिलांना पुन्हा बँकेचे उंबरठे झिजजवावे लागणार आहेत. कारण बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न असल्याशिवाय योजनेचे पैसे खात्यावर येणार नाहीत याची त्यांनाही खात्री आहे.