महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

धीरज वाटेकर यांना ‘देवर्षी नारद’ पत्रकारिता पुरस्कार

२५ वर्षांच्या विविधांगी सकारात्मक लेखनाची ‘विश्व संवाद केंद्रा’कडून दखल

चिपळूण : येथील पत्रकार-लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांना मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या वतीने दिला जाणारा पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘देवर्षी नारद’ पुरस्कार आज/काल (दि. १७) महाराष्ट्र सरकारच्या सूचना आणि माहिती महानिदेशालयाचे महानिदेशक ब्रजेश सिंह (आय.पी.एस.) यांच्याहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी वाटेकर यांची ‘प्रिंट मिडिया पत्रकार’ श्रेणीत निवड झाली होती.h वाटेकर यांनी कोकणचा इतिहास आणि संस्कृती, ग्रंथ व साहित्य चळवळ, पर्यटन, निसर्ग, पर्यावरण, सामाजिक जागृती अश्या विविध विषयांवर मागील २५ वर्षे केलेले लेखन, ब्लॉग आणि पर्यटन व चरित्र विषयावरील प्रकाशित नऊ पुस्तके यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिशिल्प आणि महावस्त्र होते.

हे या पुरस्काराचे २३वे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, मुख्य संवाद अधिकारी डॉ. निशीथ भांडारकर ज्येष्ठ पत्रकार अश्विनी मयेकर, प्रसाद काथे, प्रा. मीनल म्हापूसकर आदी उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहोळा दादर (मुंबई) येथील कीर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. विश्व संवाद केंद्राचे देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्कार हे ईमानदारी, सत्यनिष्ठा और निष्पक्षता यासाठी ओळखले जातात. या पुरस्कारांमुळे मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना व्यासपीठ मिळते आहे. अश्विनी मयेकर (संपादक-साप्ताहिक विवेक), प्रसाद काथे (संपादक-जय महाराष्ट्र, टीव्ही वाहिनी), ज्येष्ठ पत्रकार प्रणव भोंदे आणि सुधीर जोगळेकर (माजी निवासी संपादक-लोकसत्ता) यांच्या समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती.

वाटेकर यांच्या ‘प्रसन्न प्रवास’ या ब्लॉग लेखनाला रसिक वाचकांकडून साठ हजार पेज व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन या ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी आणि जनी जनार्दन हे विंचू दंशावरील लसीचे प्रवर्तक माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांचे चरित्र ही ४ अशा एकूण ९ पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘जनी जनार्दन’ या ७०८ पानी पुस्तकाबाबत ज्येष्ठ पत्रकार-संपादक व लेखक उत्तम कांबळे यांनी, ‘एका आगळ्यावेगळ्या क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तीचे असे महाचारित्र मराठी साहित्यात अपवादानेच पाहायला मिळते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या कोकण इतिहास संशोधक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या पुस्तकासह सुमारे ३५हून अधिक दस्तऐवज ठरलेल्या स्मरणिका आणि विशेषांकांचे संपादन वाटेकर यांनी केले आहे. या पुरस्कार प्राप्त पत्रकारांत वाटेकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे, वृत्तवाहिनी रिपोर्टर प्रज्ञा पोवळे, ‘मुंबई तरुण भारत’चे अक्षय मांडवकर, विविध विषयांवर लिखाण करणारे ओंकार दाभाडकर, ‘यू-ट्यूबर’ गौरव ठाकूर, मराठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणारे सचिन गायकवाड, मुंबई विद्यापीठातील मराठी पत्रकारितेतील गुणवंत विद्यार्थिनी वनश्री राडये आदी ८ जणांचा समावेश आहे.

वाटेकर यांना लेखन आणि सामाजिक क्षेत्रातील सहभागाबद्दल यापूर्वी भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या ‘तेर पॉलिसी सेंटर’कडून ‘प्रकाशाचे बेट’, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुण्यातील हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ यांचा ‘पर्यावरण दूत’ आदी पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button