कोळी समाजाचे नेते रमेशदादा पाटील यांचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने गौरव
राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित
पनवेल (सुरेश सप्रे ) : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. आमदार रमेशदादा पाटील यांना देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याहस्ते सन २०२३-२४ चा महाराष्ट्र विधानपरिषद ‘‘उत्कृष्ट संसदपटू’’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ विधानभवन येथे पार पडला.
उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार विधानभवनातील सर्वांगीण योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येतो. विधीमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, उपस्थिती, विधिमंडळात प्रश्न व विषय मांडताना वापरलेले कौशल्य, वक्तृत्व शैली, संसदीय भाषणे या सगळ्या बाबी तपासून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून संबंधित लोकप्रतिनिधींची या पुरस्कारासाठी शिफारस केली जाते.
महाराष्ट्रातील कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा. आमदार रमेशदादा पाटील यांची सन २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. मा. पाटील यांनी आमदारपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कोळी व मच्छिमार समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला व कित्येक प्रश्नांची सोडवणूक करून त्यांनी कोळी बांधवांना न्याय मिळवून दिला. विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये आदिवासी कोळी व मच्छिमार समाजाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने उपस्थित करून या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोळी बांधवांचे व राज्यातील सर्वच गरीब, शोषित, पिडीत जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांनी विविध संसदीय आयुधांचा योग्य वापर करून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी व मच्छिमार बांधवांचे प्रश्न प्राधान्याने मांडून ते प्रश्न सोडविण्याची चांगल्याप्रकारे त्यांच्याकडे हातोटी असल्याने ते आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कोळी समाजाचे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आले असून यामुळेच संपूर्ण कोळी समाज त्यांच्याकडे आपल्यावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी येत असतात. आज खऱ्या अर्थाने मा. आमदार रमेशदादा पाटील यांनी कोळी समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा हा गौरव असल्याच्या भावना सर्व कोळी समाजामधून येत आहेत.
यावेळी बोलताना मा.आमदार पाटील यांनी हा गौरव वैयक्तिक माझा नसून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी व मच्छिमार बांधवांचा असल्याचे सांगून देशाच्या राष्ट्रपतींच्या शुभहस्ते हा पुरस्कार मला देण्यात आला असल्याने हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ व निवड समितीचे आभार मानले.