कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने पंजाब कॉनवेअर सुरु होणार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : केंद्र सरकारच्या DPD धोरणामुळे उरण परिसरातील हिंद टर्मिनल,ऑलकार्गो, CWC डी नोड, पंजाब कॉनवेअर सारखे मोठ मोठे CFS बंद होत आहेत.यामुळे हजारो प्रकल्पग्रस्त बेरोजगार होत आहेत. मागील तीन महिन्या पासून पंजाब कॉनवेअर बंद असल्यामुळे कामगारांना पगार नाही. प्रकल्पग्रस्तांचे रोजगार वाचविणे तसेच CFS वाचविणे काळाची गरज आहे. कामगार नेते तथा काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रजी घरत यांनी काळाची गरज ओळखून पंजाब कॉनवेअर व्यवस्थापन व कामगारांसोबत यशस्वी चर्चा करून जानेवारीपासून सर्व कामगारांना घेऊन,किमान वेतना सहित कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला तसा करार सोमवारी करण्यात आला.
एकीकडे बंद असलेल्या हिंद टर्मिनल, cwc डी नोड या CFS मधे आलेले कंत्राटदार कंपनी सुरु करताना निम्मे कामगार-निम्या पगारावर घेण्याची अट घालत असताना कामगार नेते महेंद्र घरत यांनी पंजाब कॉनवेअरमधील सर्व कामगारांना किमान वेतनावर कामावर घेण्याचा करार केला. भविष्यात इतर कंपन्यांतील कामगारांसाठी हा करार एक मैलाचा दगड ठरेल.स्थानिकांना यामुळे मोठा रोजगारहि उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.