स्वच्छता हिच सेवा अंतर्गत पैसा फंड प्रशालेत चित्रकला स्पर्धा
- विद्यार्थ्यांनी रेखाटली गड किल्ल्यांची चित्रे
- गड – किल्यांचे संवर्धन हा स्पर्धेचा उद्देश
संगमेश्वर : स्वच्छता हिच सेवा या उपक्रमांतर्गत गड – किल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वरच्या विद्या र्थ्यांनी उत्सफूर्त सहभाग घेतला.
पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर च्या कला विभागाने आज सकाळी १० ते १२ या वेळेत या स्पर्धेचे आयोजन केले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी या गटात एकूण ३६ विद्यार्थ्यांनी तर ८ वी ते ९ वी गटात एकूण ४५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेच्या प्रारंभी कला विभागाच्या वतीने स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना समाजावून सांगण्यात आला. गड किल्ले हे आपल्या जाज्वल्य इतिहासाची आणि शौर्याची प्रतिकं आहेत. हा ऐतिहासिक वारासा पुढे अनेक पिढ्याना स्फूर्ती देत राहणार असल्याने त्यांची साफसफाई करुन स्वच्छता राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. स्पर्धेच्या आयोजनाचा हाच प्रमुख हेतू असल्याने विद्यार्थ्यांनी शक्य होईल त्यावेळी अशा स्वच्छता मोहिमेत उत्सफूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गड किल्ल्याचा इतिहास समजून घेतल्यानंतर दोन तासांच्या वेळेत विद्यार्थ्यांनी विविध गड – किल्यांची रेखाटनं करुन रंगकाम केले. कला विभागाच्या या उपक्रमाबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदिनी स्पर्धेत सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक – प्रेम संदेश धाडवे, द्वितीय क्रमांक – हर्ष रक्षपाल लोधी राजपूत, तृतीय क्रमांक – हरीश रक्षपाल लोधी राजपूत, इ. ८ वी ते १० वी या गटात प्रथम क्रमांक – रिषभ विश्वनाथ नरबेकर, द्वितीय क्रमांक – स्वर दीपक सुर्वे, तृतीय क्रमांक – शिवम सुरेश गुरव यांनी प्राप्त केला आहे.