चोरगे अॅग्रो फार्ममध्ये मधुमक्षिका पालन : पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चोरगे अॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिका पालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, तसेच परागीकरण वाढून जैवविविधतेला चालना मिळणार आहे. कोकणातील विशेष हवामान, हिरवळ आणि विविध फुलांच्या प्रजातींमुळे येथे मधमाशांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा घेत, चोरगे अॅग्रो फार्मने शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशांचे संगोपन आणि मध उत्पादन सुरू केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन कसे करायचे याचे प्रशिक्षण मिळण्याबरोबरच, त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे.
चोरगे अॅग्रो फार्मने युनिटच्या माध्यमातून मधमाशा पालनाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे, ते म्हणजे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र सुरू करणेबाबत . या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना मधमाशा पालनाचे तांत्रिक ज्ञान, संगोपन पद्धती, आणि उत्पादकता वाढवण्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून स्थानिक शेतकऱ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करून आपली आर्थिक स्थिती सुधारता येईल.
चोरगे फार्मचे संस्थापक डॉ. निखिल चोरगे म्हणाले, “मधमाशांचे पालन फक्त मध उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर ते परागीकरणामुळे इतर कृषी उत्पादनांनाही वाढवते. कोकणातील शेतकऱ्यांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.”
चोरगे अॅग्रो फार्मवर उत्पादित मध स्थानिक तसेच देशभरातील बाजारपेठेत वितरित केले जाणार आहे. पर्यटकांसाठी मधमाशांचे पालन कसे केले जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून कृषी पर्यटनामध्ये एक नवा उपक्रम सुरू केला जाईल. कोकणातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घेऊन मधमाशा पालनाचे प्रशिक्षण घेतल्यास, त्याचा फायदा फळबागा, भातशेती, आणि इतर कृषी उद्योगांवर होईल, आणि कोकणातील कृषी क्षेत्राला एक नवा आयाम मिळेल. या प्रकल्पासाठी खादी ग्राम उद्योग चे मास्टर ट्रेनर भारत सरकार व इंडी सहयोग परिवार या संस्थे संचालक श्री प्रशांत रामचंद्र सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले