लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
मुंबई : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले होते. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. गेल्या २-३ दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये आपली छाप पाडली होती.
अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा मालिकेमध्ये हुबेहुब साकारली होती. त्यांचे ‘नातीगोती’ हे नाटक चांगलेच गाजले. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते. अनेक मराठी नाटकांमध्ये अतुल परचुरे यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले.
‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.अलिबाबा आणि चाळीशीले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरू केले होते. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर येताच कला विश्वास हळहळ व्यक्त होत आहे.