छायाचित्र दिनदर्शिकेतून नवीन पर्यटनस्थळांची ओळख होईल
अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे प्रतिपादन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : ई मेज कॅलेंडरच्या माध्यमातून छायाचित्रांद्वारे आपल्या जिल्ह्यातील निसर्गाची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. जिल्हा मुख्यालय अलिबाग येथील तीन छायाचित्रकारांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना आपला छंद जपण्याचे काम अनेकजण करतात. त्यांना व्यासपिठ देण्याचे काम ई मेज कॅलेंडद्वारे मिळाले आहे. असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.
या छायाचित्रामुळे नव्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याचा मार्ग मिळाला आहे. ई मेज कॅलेंडरमधून नव्या पर्यटन स्थळांची ओळख होत आहे. मलादेखील फोटोग्राफीची आवड आहे, मी देखील या उपक्रमात सहभाग घेण्याचा प्रयत्न करेन. लहान मुलांनी काढलेले फोटो या कॅलेंडरमध्ये प्रसिध्द करून त्यांनादेखील संधी देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.
इमेज कॅलेंडर 2023 प्रकाशन सोहळा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अलिबाग नगरपरिषदेचे माजी गटनेते तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, आदर्श पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, आदर्श पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष अभिजीत पाटील, रमेश कांबळे , जितेंद्र शिगवण, समीर मालोदे, प्रफुल्ल पवार , प्रकाश सोनवडेकर, ऍड. वैभव भोळे, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, महेश पोरे, अविनाश घाडगे, सचिन पावशे, संदीप जगे, अलिबागमधील सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, छायाचित्रकार आणि विजेते स्पर्धक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ईमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा व विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी गटनेते प्रदिप नाईक म्हणाले, मागील पाच वर्षापासून ई मेज कॅलेंडर प्रकाशित होत आहे, जवळजवळ सर्वच कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहिलो आहे. त्यामुळे हा प्रवास मी स्वतः बघितलेला आहे. त्याचा मला विशेष आनंद होतो.
रमेश कांबळे, जितू शिगवण, समीर मालोदे या तीन छायाचित्रकारांनी ईमेज कॅलेंडरची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. ईमेज कॅलेंडरच्या स्पर्धेमध्ये फक्त छायाचित्रकार नसून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला आहे. यातून छायाचित्राची आवड असणाऱ्यांना एक संधी देण्यात आली आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून अलिबागमध्ये फेस्टीवल भरवतो. या फेस्टीवलमधून सर्वाचे चित्रांचे प्रदर्शन भरवता येईल. यातून सर्वांनाचा व्यासपिठ मिळेल. हे कॅलेंडर लोकांपर्यंत पोहचविता येईल. रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. विकेंड कन्सेप्ट आपल्याकडे आली आहे. या कॅलेंडरचा पर्यटन वाढीसाठी नक्कीच हातभार लागेल. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पत्रकार छायाचित्रकारांचा सहभाग असतो. एकत्र काम केले, निश्चित पणे सर्वांना फायदा होईल. असे प्रदिप नाईक यांनी सांगितले.