द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नाही : चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : महाभारतातील कथा सांगताना द्रौपदीचे वस्त्रहरणाची कथा सांगितले जाते. वास्तविक द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नव्हते. झाले त्याला फार तर वस्त्राकर्षण म्हणता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.
रत्नागिरीत सुरू असलेल्या चौदाव्या कीर्तनसंध्या महोत्सवात ते सध्या महाभारत या विषयावरील निरूपण करत आहेत. ते म्हणाले की, महाभारत कथांपैकी काही कथा काही लेखकांनी नाट्यमयता म्हणून रंगविल्या. मात्र त्याच खऱ्या असल्याचे लोकांना वाटते. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रात महाभारताच्या दोन मूळ प्रती उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केल्यानंतर अनेक कथांचा उलगडा होतो. त्यातच वस्त्रहरणाची कथा आहे. राजसूय यज्ञामुळे कौरव चिडले होते. वास्तविक मयसभेच्या वेळी द्रौपदी तेथे उपस्थित नव्हती. त्यामुळे ती त्यांना हसलीच नव्हती. तरीही द्रौपदी आपल्याला हसल्याचे दुर्योधनाने आपल्या वडिलांना खोटे सांगून त्यांना पांडवांच्या विरुद्ध बेबनाव रचायला उद्युक्त केले. त्यांनी पांडवांना द्यूतामध्ये हरवले. त्याचा सगळा दोष कौरवांना देण्यापेक्षा पांडवांनीही द्यूत खेळायला नकार द्यायला हवा होता. त्यांच्या हातात अधिकार होते. कारण ते तेव्हा सत्तारूढ होते. मात्र कित्येक वेळेला सज्जनांचा बेसावधपणा किंवा अतिआत्मविश्वास संकटांना जन्म घालतो. त्याचे उदाहरण असलेल्या या प्रसंगावरून महाभारतातून हीच शिकवण मिळते. शत्रूकडूनच नव्हे, तर मित्रांकडूनही बेसावध राहून चालणार नाही. पांडव बेसावध होते. त्यातून हा प्रसंग घडला. ते द्यूतातील एकेक डाव हरत गेले. मात्र दुर्योधनाचा जे खोटे सांगितले तेच खरे मानून त्यावर मालिका तयार केला जातात. यातच पुढे धर्मराजाने एकेक भाऊ, त्यांची शस्त्रे आणि अखेर पत्नी द्रौपदीला पणाला लावले. धर्मराज हरल्यानंतर द्रौपदीच्या अवमानाचा प्रसंग घडला. मात्र तिचे वस्त्रहरण झाले नाही. फक्त वस्त्र ओढण्याचा प्रयत्न झाला. कृष्णाच्या शक्तीमुळे वस्त्रहरणापासून तिची मुक्तता झाली. दुःशासनाकडून तिचे केवळ वस्त्राकर्षण झाले. याकडे अतिशय गंभीरपणे त्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या घरातल्या किंवा कोणत्याही स्त्रीचा जे कोणी अपमान करेल, त्याचे कुळच नष्ट होते, असा याचा अर्थ आहे. तो प्रसंग महत्त्वाचा नाही. प्रसंगाचे तात्पर्य महत्त्वाचे आहे.
समारंभात तीन सत्कार करण्यात आले. रत्नागिरीतील टिळक आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दीनिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष शशिकांत नारायण काळे यांचा सन्मान करण्यात आला. गेली १०६ वर्षे म्हणजे पाच हजार ५१२ आठवडे दर शनिवारी मंडळातर्फे भजन परंपरा सुरू आहे, याचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कीर्तनसंध्येच्या उपक्रमाची स्वतःहून दखल घेतली आणि सर्व सहकार्य करण्याची खात्री दिली. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच्या वतीने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी तो स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. श्री. कुलकर्णी यांनी काही काळ कीर्तनाचा आनंद घेतला.