कलाकारांची तपश्चर्या त्यांच्या कलाकृतीतून दिसून येते : प्रकाश राजेशिर्के

- सह्याद्री कला महाविद्यालयात कलाकारांची प्रात्यक्षिके
- कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
संगमेश्वर : कलाकार चित्र आणि शिल्प घडवण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करत असतो. कुंचला आणि रंगावर प्रभुत्व मिळवणे, हा यातील सरावाचा आत्मविश्वासाच आणि आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचा भाग असतो. उत्तम कलाकृती साकारण्यासाठी कलाकाराला या तापश्चर्येंचीच साथ मिळत असते . सह्याद्री कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त आयोजित केली जाणारी कलाकारांची प्रात्यक्षिके ही नवोदित कलाकारांसाठी मोठी संधी असते, असे मत ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी व्यक्त केले.

सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकार आणि शिल्पकार यांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात राजेशिर्के हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर येथील चित्रकार बबन माने, विजय टिपुगडे , विजय उपाध्ये , पुणे येथील चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर, शिल्पकार संदीप ताम्हणकर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, प्रा. प्रदीप कुमार देडगे, प्रा. अमित सुर्वे, प्रा. रुपेश सुर्वे, प्रा. अवधूत खातू, प्रा. विक्रांत बोथरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर येथील चित्रकार बबन माने यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सच्या इमारतीचे जलरंगात, तर चित्रकार विजय टिपूगडे यांनी निसर्गातील पाणवठ्याचे ऍक्रलिक रंगात, चित्रकार विजय उपाध्ये यांनी आकाशातून दिसणाऱ्या होडी आणि पाणी या दृष्याचे जलरंगात, तर पुणे येथील चारकोल आर्टिस्ट सतीश सोनवडेकर यांनी चाराकोल मध्ये व्यक्तीचित्रणाचे, शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी शाडू माती मध्ये व्यक्ती शिल्पाचे प्रात्यक्षिक कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपुढे सादर केले. चारही कलाकारांनी केवळ ५० मिनिटांमध्ये आपला अद्वितीय कलाविष्कार सादर केला. सह्याद्री कला महाविद्यालयातील युवा कलाकार ही प्रात्यक्षिके पाहून भारावून गेले.
वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त सह्याद्री कला महाविद्यालयात सादर केली जाणारी नामवंत कलाकारांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणा देणारी ठरतात. यासाठी दरवर्षी आम्ही विविध कलाकारांना निमंत्रित करत असतो. युवा कलाकारांनी कलाक्षेत्रात विशिष्ट उंची गाठावी हा या मागचा उद्देश असतो.
-माणिक शिवाजी यादव, प्राचार्य सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे
सह्याद्री कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर सलग चार वर्षे आम्हाला नामवंत चित्रकार – शिल्पकार यांची एकापेक्षा एक सरस अशी प्रात्यक्षिके पाहायला मिळाली हे विद्यार्थी म्हणून आमचं भाग्यच आहे. अशा प्रात्यक्षिकांमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि नवंनवीन कलाकारांजवळ ओळख झाली, याचा आम्हाला आमच्या भावी कलाजीवनात नक्कीच चांगला फायदा होईल.
-सुजल निवाते, विद्यार्थी, रेखा व रंगकला विभाग.