रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे डहाणू कोळंबी संवर्धन केंद्रात कार्यानुभव प्रशिक्षण

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी’ ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग’ या विषयांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जतिन केनी यांच्या मालकीच्या कोळंबी संवर्धन केंद्र ‘केनी ॲक्वा फार्म’, डहाणू पालघर आयोजित करण्यात आले आहे.




श्री. जतिन केणी हे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या सहाव्या बॅच चे विद्यार्थी असून त्यांनी २०१८-१९ या शैक्षणीक वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व इतर ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर सन २०२२ पासून त्यांनी स्वतःचा कोळंबी संवर्धन हा व्यवसाय सुरू केला आहे. या कार्यानुभव प्रशिक्षणामध्ये कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णूकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
या कार्यानुभव प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तलावात कोळंबी संवर्धन पद्धत, तलावाचे डिझाईन, लागणारी वायुविजन यंत्रणा, पाण्याचे मापदंड, कोळंबी आरोग्य व्यवस्थापन व इतर उपकरणे हाताळणे आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग याचे सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत.
या प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी केनी ॲक्वा फार्मचे अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य/सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.