नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड स्थानकात नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासंदर्भात आज राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची एका शिष्टमंडळाने मुंबईमध्ये भेट घेऊन पत्र देत त्यांचे या संदर्भातील प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. येत्या 26 जानेवारीला या संदर्भात उपोषणाची हाक दिलेल्या आंदोलनकर्त्यांना ना. सामंत यांनी आश्वस्त केले असून या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रही दिले आहे.
या संदर्भात संगमेश्वरवासीयांच्या वतीने आंदोलनाची हाक दिलेले संदेश जिमन व त्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली.
संगमेश्वर तालुका हा आपल्या मतदारसंघात असून पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका महत्वपूर्ण आहे. या तालुक्यात पर्यटन तसेच ऐतिहासिक अशी अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे संगमेश्वर रोड सांगतात नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी विनंती या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून केली आहे.