शिवकालीन वंशजांच्या साक्षीने केळवणे गावात शिवस्मारक लोकार्पण सोहळा उत्साहात

उरण (विठ्ठल ममताबादे ) : यावर्षीच्या शिवजयंतीचे औचित्य साधून केळवणे गावातील ट्रेकर्स ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती , जगाच्या पाठीवर प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, आदर सन्मान आणि जल्लोषाने, साजरी केली जाते.
पनवेल तालुक्यातील सर्वात मोठ्या केळवणे गावात शिवप्रेमाने प्रेरित होऊन अनेक ग्रुप आणि समूह तर्फे शिवरायांच्या तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे दोन्हीही शिवजयंत्या मोठ्या हर्ष जल्लोषाने साजरी केली जाते.तसेच या दिवसात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवतात.
या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १२ व्या थेट वंशज डॉ .शितल ताई शिवराज मालुसरे, बांदल घराण्याचे वंशज श्री. अनिकेत राजे बांदल व हिरोजी इंदलकरांचे वंशज श्री श्रीनिवास इंदलकर उपस्थित होते. शिवव्याख्याते ॲड विवेक भोपी व कार्यक्रमाचा प्रमुख भाग रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी मराठ मोळे पोवाडे सादर केले. तसेच या कार्यक्रमास रायगड राज्याभिषेक पुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात डोळ्याचे पारणे फिटावे असा हा नेत्रदीपक सोहळा केळवणे गावातील संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि कार्यक्रमास आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अनुभवली. या कार्यक्रमाचे सर्वत्र चर्चा होऊन सर्वांचे कौतुक होत आहे.
