खासदार नारायण राणे यांचा कोकण विकासासाठी कायम संघर्ष : ना. उदय सामंत

देवरुख : कोकणच्या विकाससाठी कोकणचे सुपुत्र असलेले खासदार नारायण राणे यांनी कायम संघर्ष केला आहे. विकासासाठी त्यांची संघर्षमय वाटचाल विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार जिल्ह्यातील पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.

देवरुख येथे गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, संघर्षाची व्याख्या म्हणजे नारायणराव राणे साहेब असून कोकणच्या विकासासाठी कायमच संघर्ष करत आलेले कोकणचे सुपुत्र नारायणराव राणे साहेबांना तमाम कोकणवासियांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत कोकणच्या विकासासाठी सतत झटणारे आणि आपल्या आगळ्या वेगळ्या राजकीय शैलीने संपूर्ण राज्यसह देशाला परिचित असणारे राणे यांच्या राजकीय कारकिर्दीवर या कार्यक्रमातून अल्पसा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.
यावेळी डॉ. उदय सामंत यांनी आयुष्यात राणे यांच्या माध्यमातून आलेल्या आठवणी यावेळी व्यक्त केल्या. राणे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या अल्पशा कार्यकाळातील विकासकामांनी कोकणातील सर्व जिल्ह्याना एक वेगळे स्वरूप आल्याची आठवण यावेळी सांगितली. तसेच राणे साहेब व कुटुंबियांच्या वतीने भविष्याकाळातही अशीच सामाजिक, राजकीय सेवा घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या.