भविष्यात अहमदाबादसारख्या घटना घडू नये आणि कोणावरही असा प्रसंग येऊ नये हीच ईश्वराला प्रार्थना

- अहमदाबाद विमान अपघातातील मृत मैथिलीच्या वडिलांचे खा. सुनील तटकरेंना भावनिक साद
उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि कोणावरही असा प्रसंग येऊ नये हीच ईश्वराला प्रार्थना अशी आर्त विनवणी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली मोरेश्वर पाटीलचे वडील मोरेश्वर पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. हे सांगताना ते अक्षरश: ओक्साबोक्सी रडले. यावेळी तटकरे यांनी देखील दुःख फार मोठे आहे मात्र स्वतःला सावरून घ्या अशी विनंती करून आपल्या इतर दोन मुलांच्याकडे जास्तीत लक्ष देण्याची विनंती केली.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या न्हावा येथील घरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी उरण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष परिक्षीत ठाकूर , माजी अध्यक्ष मनोज भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते अजित पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर,भूषण ठाकूर , रमण कासकर, माजी सरपंच तथा मैथिलीच्या आईचे मामा जितेंद्र म्हात्रे , विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील , उपसरपंच शैलेश पाटील, ॲड. विरा म्हात्रे, मिनाक्षी पाटील, अनिशा पाटील आदी यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मोरेश्वर पाटील यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत देत मैथिलीच्या अनेक आठवणी सांगितल्या. मैथिली ही अतिशय देवभक्तीवालीवाली होती ती नेहमी जपमाळ जपत असे तिच्या बॅग मध्ये एक जपमाळ असायची आणि दुसरी जपमाळ घरी असायची. आम्हा सर्वांसाठी आणि भावंडांसाठी ती एक प्रेरणा होती. तिच्या जाण्यावर आमचा अजूनही विश्वासचं बसत नसल्याचे त्यांनी तटकरेंना माहिती देताना सांगितले. त्याच बरोबर मैथिलीच्या लहान बहीण सध्या बायो टेकमध्ये शिक्षण घेत आहे तर लहान भाऊ ट्रेनिंग शिप रहेमानमध्ये यावर्षी अकरावीला असून त्यांच्या भवितव्यासाठी सरकारने काहीतरी करावे अशी विनंती देखील मोरेश्वर पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांना आश्र्वासित करतांना आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत असे आश्र्वस्त केले असून योग्य ते सर्व सहकार्य केले जाणार असल्याचे सांगून मैथिलीचे शव लवकरात लवकर मिळावे यासाठी मी स्वतः आत्ता येतानाच थेट गृहमंत्र्यांसोबत बोललो असून ते आज किंवा उद्यापर्यंत मिळेल असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी तटकरे यांनी सर्वांना नमस्कार करून त्यानंतर मुंबईकडे रवाना झाले.