राजापूरमधील नाटे बाजारपेठेत भीषण आग ; सात दुकानांची राखरांगोळी

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठ शनिवारी रात्री (२८ जून) भीषण आगीच्या घटनेने हादरली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत सात दुकाने जळून पूर्णतः खाक झाली. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
ही दुकाने राजेश दत्ताराम पावसकर (धाऊलवल्ली) यांच्या मालकीच्या एका इमारतीत होती. त्या ठिकाणी सात वेगवेगळे व्यवसाय सुरू होते. परंतु या आगीत सर्व मालमत्ता जळून खाक झाली. सुदैवाने इमारतीत कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली, पण लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर सागरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अश्वनाथ खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने रात्री २.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सकाळी ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत मदतीसाठी पुढाकार घेतला.