राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजने अंतर्गत रत्नागिरीतील १५५ मुलांची तपासणी
ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा उपक्रम ; २२ मुलांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया
रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी मागील काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करणार्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालगटासाठी मोफत 2डी इको तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात 155 बालकांची 2डी इको केल्यानंतर यातील 22 मुलांच्या सर्जरीचा सल्ला वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुंबईतील एसआसीसी चिल्ड्रन्स हॉस्पीटल यांच्या माध्यमातून हे शिबीर पार पडले.
ना. सामंत यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत यासाठी नियोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी मंडणगडपासून राजापूरपयर्र्तच्या नऊ तालुक्यातील अनेक पालक आपल्या मुलांना तपासणीसाठी घेऊन आले होते. वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने पालकांना मार्गदर्शनाबरोबरच नोंदणीपर्यंत सर्व मदत अगदी पाण्यापासून नाष्टा व जेवणा पर्यंतची सुविधा पुरवण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे असेे मानत आरोग्य सहाय्य कक्षाच्यावतीने मागील सहा महिन्यात हे दुसरे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 0 ते 18 वर्ष वयोगटातील तपासणीसाठी आलेल्या मुलांपैकी 155जणांची 2डी इको तपासणी करण्यात आली. त्यातील 22जणांच्या सर्जरीसाठी डॉक्टरांनी सूचना केली आहे. मुंबईतील एसआसीसी चिल्ड्रन्स हॉस्पीटलतर्फे या मुलांवर टप्प्याटप्प्याने मोफत सर्जरी केली जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी सुरु झालेली ही तपासणी सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात सुरु होती. ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे महेश सामंत, सागर भिंगारे व त्यांचे सहकारी यासाठी मेहनत घेत होते. प्रत्येक तालुका पातळीवर या शिबिराची माहिती देण्यात आली होती. या शिबिराचे अनौपचारीक उद्घाटनही करण्यात आले नाही. रुग्णांची सेवा हेच ब्रीद घेऊन ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्ष काम करीत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह मुंबईतून आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीज शेठ आणि अमित केळकर यांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक व त्यामध्ये डॉक्टरांचेही यावेळी आभार मानण्यात आले.