प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण

रत्नागिरी : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार विजेत्यांमध्ये यशवंत गणपत शेलार (नेवरे) यांना प्रथम, रत्नप्रभा उदय ढवळे (वेळवंड) यांना द्वितीय, तर इंदू लक्ष्मण कोळंबेकर (कोतवडे) यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला, तर चवे आणि गोळप ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा मान कोतवडेने मिळवला.
राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार विजेत्यांमध्ये विश्वास लक्ष्मण फुटक (कुरतडे) यांना प्रथम, संगीता बबन सावंत (वळके) यांना द्वितीय, तर उज्ज्वला रमेश सुतार (गावखडी) यांना तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले.
या योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये कोतवडेने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला, तर गावखडी आणि निरुळ ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले. राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार पावसने जिंकला.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० लाभार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि चावी देऊन सन्मानित करण्यात आला. गट विकास अधिकारी चेतन शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहायक व लाभार्थी उपस्थित होते.