महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

राजापूरमध्ये दोन प्राचीन पायऱ्यांच्या विहिरींसह तलाव आढळला

राजापूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली आणि पाणेरे तिठा या भागात दोन बारव आणि एक तलाव आढळून आले आहेत. ही बारव आणि तलाव मध्ययुगीन कालखंडातील बांधण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात असून त्या काळातील आदर्शवत जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना बघायला मिळत आहे. हे मध्ययुगीन कालखंडातील असल्याचा पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दुजोरा दिला आहे.

राजापूर-धारतळे मार्गावरील कोतापूर तिठा येथे असणार्‍या प्रवासी मार्ग निवारा शेडच्या मागच्या बाजूच्या जंगलमय भागामध्ये एक बारव (पायर्‍यांची विहिर) आढळून आली आहे. ही बारव पुर्णत: कातळ खोदून तयार करण्यात आले आहे. हे साधारण ५० ते ६० फुट खोल आहे. या बारवमध्ये एका बाजुने आतमध्ये उतरण्यासाठी पुर्वेकडून पश्चिमेकडे उतरणार्‍या पन्नास पायर्‍या आहेत. नंदा प्रकारातील ही बारव मध्ययुगातील जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना असल्याचे बोलले जात आहे. याच परिसरामध्ये सुमारे ५० ते ६० फुट लांब आणि २५ ते ३० फुट रुंदी असलेला धारतळे येथे तलाव असून हा तलावही नंदा प्रकारातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अलिकडच्या काळामध्ये या तलावाच्या येथे कठडा बांधण्यात आला असून या नव्या बांधकामामुळे या तलावाचे मुळ स्वरुप झाकले गेले आहे. मात्र तरीही त्याच्या जवळ गेल्यावर याची खोदाइ व तत्कालीन बांधकाम शैलीची जाणीव होते. धारतळे पासून सुमारे पाच कि.मी.अंतरावर पाणेरे फाटा येथेही नंदा प्रकारातील बारव आहे. पाणेरे फाटा आणि कोतापूर अशा दोन्ही ठिकाणच्या बारवमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे. पाणेरे फाटा येथील बारव सद्यस्थितीमध्ये पाण्याने पूर्ण भरलेली आहेत. कातळात असणार्‍या बारव व तळींचे योग्य प्रकारे जतन अन् संवर्धन झाल्यास अनेक गावांची पाण्याची समस्या दूर होवू शकते. ही बारव व तळी विनोद पवार यांना आढळून आली असून या शोध मोहिमेमध्ये त्यांना जगन्नाथ गुरव यांचे सहकार्य लाभले आहे. श्री. पवार यांनी केलेल्या या नाविण्यपूर्ण संशोधनाचे कौतुक केले जात आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button