आजीची भाजी रानभाजी : करवंद

‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे, करवंद!
करवंदांमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पित्तावर हे फळ अत्यंत गुणकारी ठरते. कोलेस्ट्राॕलचे प्रमाण कमी करण्यास हे फळ मदत करते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण देखील करवंद कमी करते. करवंदाच्या सालीचा उपयोग विविध त्वचारोगावर केला जातो. च्युइंग गम बनविण्यासाठी देखील याचा उपयोग करतात.
सरबत तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली एक किलो करवंदे निवडावीत. दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावीत. एक लिटर पाण्यात ही फळे टाकून शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर मलमलच्या कपड्यातून हा लगदा गाळून घ्यावा. तयार झालेल्या रसामध्ये 400 ते 500 ग्रॅम साखर, 1200 मि.ली. पाणी टाकून ढवळून घ्यावे.
चवीसाठी थोडे मीठ व जिऱ्याची पावडर घालावी. हे सरबत जास्त काळ टिकवून ठेवायचे असल्यास 70 अंश तापमानास 15 ते 20 मिनिटे गरम करावे. त्यानंतर हवाबंद बाटलीत भरुन ठेवावे.
करवंदाची चटणी बनविण्यासाठी एक किलो फळांच्या काढलेल्या गरात साखर व मीठ मिसळून हे मिश्रण उकळण्यास ठेवावे. एका कपड्यात कांदा, लसूण, आले बांधावे व दुसऱ्या कपड्यात मिरची पावडर, वेलदोडे, दालचिनी मसाले बांधावेत. दोन्हीच्या पुरचुंड्या बनवून उकळत्या मिश्रणात सोडाव्यात. थोड्या थोड्या वेळाने पळीने या पुरचुंड्या दाबाव्यात. मिश्रण घट्ट झाल्यावर पुरचुंडी चांगली पिळून काढावी. व्हिनेगर टाकून एक ते दोन मिनीटे उकळून घ्यावे. हे मिश्रण बाटलीत भरण्यापूर्वी 250 पिपीएम सोडिअम बेंझॉईट मिसळावे. हवाबंद बाटलीत मिश्रण भरुन थंड करुन घ्यावे.
करवंदाचे लोणचे करण्यासाठी दीड किलो करवंदे 250 ग्रॅम तापवून घेतलेले मीठ, 20 ग्रॅम मेथी, 30 ग्रॅम हळदपूड, 50 ग्रॅम हिंगपूड, 50 ग्रॅम लाल मिरची पावडर, 100 ग्रॅम मोहरी पावडर, 400 ग्रॅम गरम करुन थंड केलेले गोडेतेले साहित्य घ्यावे. निरोगी फळे निवडून त्यांचे देठ काढून घ्यावेत. पाण्याने स्वच्छ धुवून निम्मे मीठ व हळद लावून दोन ते तीन तास एका पातेल्यात ठेवावे. निम्म्या गोडेतेलात मेथी, हिंग, मोहरी, हळद यांची फोडणी द्यावी. पाणी निथळून गेल्यावर ही फोडणी करवंदांवर टाकावी. हे मिश्रण चांगले मिसळून त्यात 250 250 पिपीएम सोडिअम बेंझॉईट टाकावे.
एका काचेच्या बाटलीत हे लोणचे भरुन उरलेले तेल त्यात ओतावे. तेलाची पातळी लोणच्याच्या वर राहील याची काळजी घ्यावी. हे लोणचे कोरड्या जागी साठवून ठेवले तर वर्षभर टिकते.
करवंदांपासून चेरी, जॅम, सिरप आदी प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात. या पदार्थांना बाजारात भरपूर मागणी आहे.
–प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी