Konkan Railway | रो-रो कार वाहतूक सेवेला सिंधुदुर्गात नांदगावमध्येही थांबा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर येत्या गणेशोत्सवात जाहीर करण्यात आलेल्या रो रो कार सेवेला गोव्याबरोबरच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा स्थानकादरम्यान कोकण रेल्वेची रो रो मालवाहतूक सेवा वापरून खासगी कार रेल्वेने गावाला नेता येणार आहे.

कोकण रेल्वेची रो रो मालवाहतूक सेवा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच सेवेचा वापर करून मालाच्या ट्रक बरोबरच आता खासगी कारधारकांना त्यांची कार रेल्वेने नेता येणार आहे. कारबरोबर अन्य तिघांना या मालवाहतुकीच्या गाडीला जोडलेल्या प्रवासी कोच मधून प्रवास करता येणार आहे.
मात्र आता ही सेवा वापरून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा स्थानकादरम्यान मध्ये कुठेही कारची चढ उतार करण्याचा थांबा नसल्याने या योजनेला कितपत प्रतिसाद लाभेल, अशी शंका निर्माण झाली होती.
हे देखील वाचा : Konkan Railway | कणकवली रेल्वे स्थानकावर लवकरच एस्केलेटर!
अशातच आता रेल्वेने सिंधुदुर्गातील नांदगाव स्थानकावरहि थांबा दिल्यामुळे खासगी कारधारकांना दिलासा मिळाला आहे.