महामार्गावर हातखंबा येथील अपघातांचे सत्र सुरूच ; खड्डयांमुळे ट्रक गटारात

- हातखंबा-गुरववाडी रस्त्यावर मोठा अपघात टळला
रत्नागिरी : हातखंबा दर्गा ते गुरववाडी दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा अपघाताच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. नरम माती आणि प्रचंड खड्ड्यांमुळे रस्त्याचे स्वरूप अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यासारखे झाले आहे. अशाच एका खड्डेमय उतारावर, ट्रक (MH10 CQ 9477) पुढील गाड्यांवर आदळण्याआधी चालकाने प्रसंगावधान राखून टतो थेट गटारात घालून मोठा अपघात टाळला. ही घटना बुधवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मुंबई गोवा महामार्गाने पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणारा ट्रक हातखंबा गुरववाडी येथील उतारावर आला असता, समोरच्या गाड्या खड्ड्यांमधून सावकाशपणे मार्गक्रमण करत होत्या. यावेळी ट्रकच्या वेगावर नियंत्रण ठेवणे कठीण बनले होते. मात्र, चालक ज्ञानोबा चौरे (वय 35) यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून गाडी बाजूला घेतली आणि गटारात घालून पुढील गाड्यांना धडक देण्यापासून रोखले. या घटनेमुळे एका संभाव्य भीषण अपघातापासून अनेकांचे प्राण वाचले. नागरिकांनी चालकाच्या प्रसंगावधानाचे आणि धाडसाचे कौतुक केले.
घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्राचे पोलिस प्रताप सकपाळ, कुलदीप दाभाडे आणि प्रताप वाकरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी तत्परतेने काम केले.
- ‘महामार्ग’ फक्त नावालाच; खड्ड्यांचा मार्गच प्रत्यक्षात!
गुरववाडी ते हातखंबा गावापर्यंतचा रस्ता तीव्र उताराचा आहे. त्यातच साचलेल्या मातीमुळे मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना घडत असून, महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे ठेकेदार कंपनी ही बिनधास्त आहे. ठेकेदाराने केलेले उथळ डांबरीकरण, देखरेखीचा अभाव आणि प्रशासनाची ढिसाळ नियोजनशैली यामुळेच खड्ड्यांचे रस्ते बनले आहेत. जनतेचा जीव धोक्यात आहे, पण जबाबदार यंत्रणा मात्र गप्प आहेत, असा संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था ही अपघातांना निमंत्रण देत आहे, आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच ठेकेदारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी, अशी मागणी आता वाहनचालकांकडून केली जात आहे.