गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज

- प्रवाशांसाठी आरोग्य पथकांसह विशेष सोयी-सुविधा
रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने कंबर कसली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
आरोग्य पथके आणि सुरक्षा व्यवस्था:
प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी २५ ऑगस्टपासून कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, रेल्वे सुरक्षा बलासोबतच स्थानिक पोलीसही प्रवाशांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी दिमतीला असणार आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवली जाणार आहे.
गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या
गणेशोत्सवाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता कोकण रेर्ल्वेने प्रवाशांसाठी विशेष गणपती स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे. मध्य, कोकण, पश्चिम आणि दक्षिण रेल्वे यांच्या समन्वयातून कोकण मार्गावर एकूण ३६६ गणपती स्पेशलच्या फेऱ्या धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना आपल्या गावी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. उधना, विश्वामित्री, वडोदरा, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, आणि वांद्रे यांसारख्या प्रमुख स्थानकांवरून या विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत.