कोकण रेल्वेच्या टीटीईच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश!

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या टीटीई (Travelling Ticket Examiner संदेश चव्हाण यांच्या अतुलनीय सतर्कतेमुळे एका दोन वर्षांच्या अपहृत मुलाची सुटका करण्यात यश आले आहे. चव्हाण यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, कोकण रेल्वे प्रशासनानेही याची तातडीने दखल घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
२७ सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमध्ये टीटी ई संदेश चव्हाण यांना एक व्यक्ती एका लहान मुलासोबत संशयास्पद अवस्थेत आढळला. त्या इसमाचे मुलासोबतचे वागणे चव्हाण आणि अन्य प्रवाशांनाही संशयास्पद वाटले. संदेश चव्हाण यांनी लागलीच त्याची चौकशी सुरू केली, परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून ते मूल त्याचे नसून, त्याने त्याचे अपहरण केले असावे, असा चव्हाण यांचा संशय बळावला.
टीसी संदेश चव्हाण यांची तत्परता
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता टीसी संदेश चव्हाण यांनी त्या संशयित इसमाला धरून ठेवले. त्याचवेळी त्यांनी तत्काळ चालत्या ट्रेनमधून नियंत्रण कक्ष वाडी बंदर, लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे येथे माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ताजने आणि ड्युटीवरील पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी अमोल अनंत उदलकर (वय ४२, रा. इंदील देवगड) याला आणि मुलाला ताब्यात घेतले.
मुंबईतून झाले होते अपहरण
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अमोल अनंत उदलकर याने सदर मूल मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले. अपहृत मुलाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय २) असून, त्याची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीजवळ असलेल्या त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून गौरव
टीसी संदेश चव्हाण यांनी दाखवलेल्या असाधारण सतर्कतेमुळे एका निरागस बालकाचा जीव वाचल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही याची तातडीने दखल घेत, संदेश चव्हाण यांचे विशेष कौतुक केले असून, त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संदेश चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.