‘ज्ञान प्रबोधिनी’कडून तिसऱ्यांदा चिपळूणमध्ये विद्याव्रत उपक्रमाचे आयोजन

चिपळूण : राष्ट्रनिर्माणासाठी मनुष्य निर्माण असं व्रत घेऊन संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही उत्तुंग काम करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून चिपळूण परिसरातही मागच्या एक तपाहून जास्त कालावधीत ज्ञानप्रबोधिनी उपक्रम केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्त्री शक्ती प्रबोधन, कला, खेळ, विज्ञान, व्यक्तिमत्व विकसन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित अनेक उत्तम उत्तम उपक्रम सातत्याने चालू आहेत.
ज्ञान प्रबोधिनी म्हणजे शिक्षणातला वेगळा विचार!
विविध क्षेत्रात देशाचं नेतृत्व करू शकतील अशी व्यक्तिमत्व निर्माण करणे अशा उद्देशाने शाळा स्तरावरचे अनेक उपक्रमही सातत्याने केंद्रामार्फत आयोजित केले जातात.
शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना ध्येयवादी बनवणे, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे अशा उद्देशाने कोणत्याही शाळेत जाणाऱ्या, कोणत्याही माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता आठवीतून नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या तीन महिन्याच्या कालावधीत ज्ञानप्रबोधिनीच्या चिपळूण उपक्रम केंद्राच्या माध्यमातून यावर्षी विद्याव्रत संस्कार उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.याआधीही दोन वेळा यशस्वीपणे विद्याव्रत संस्काराचा उपक्रम येथील केंद्राच्या माध्यमातून संपन्न झाला होता त्यामुळे केंद्राकडून आयोजित केला जाणारा हा तिसरा विद्याव्रत संस्कार कार्यक्रम!
व्यक्तिमत्व घडणीसाठी उपयुक्त आहार विहाराच्या सवयी परिणामकारक होण्यासाठी इंद्रियसंयमनाला नियमित उपासनेची जोड देत स्वतःच्या अध्ययनाला प्रगल्भ करण्यासाठी अनेक सद्गुरूंप्रती कृतज्ञ राहून आपले जीवन राष्ट्रासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने आपल्या अभ्यासाच्या दिशा ठरवता यायला हव्यात . अशा दिशा निश्चित करण्या साठी ‘ विद्याव्रत’ घ्यायचे म्हणजे नियमित अभ्यास करत राहू असे स्वतःला सतत सांगत रहायचे! असे व्रत आपल्यापेक्षा मोठ्या अनुभवी लोकांच्या सानिध्यात राहून प्रकटपणे सर्वांसमक्ष घ्यायचे आणि आम्ही अभ्यासच करत राहू असे ठरवून आयुष्यात यशस्वी व्हायचे म्हणजे विद्याव्रतार्थी व्हायचे!
विविध खेळ,उपक्रम, व्यक्ती भेटी अशा माध्यमातून
विद्याव्रताची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर ते मार्च या तीनही महिन्यातल्या एकूण सहा रविवारी पूर्वतयारीच्या सत्रांचे नियोजन केंद्राकडून करण्यात आले आहे.या सत्रांमधून तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांचा सहवास आणि मार्गदर्शनातून सहभागी मुलांची विद्याव्रताची पूर्वतयारी करून घेण्यात येईल.
विद्याव्रत घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासूनचा अभ्यासाविषयी बदललेल्या सकारात्मक दृष्टिकोन हा जाणवणारा दृश्य बदल मागील दोन्ही विद्याव्रत संस्काराच्या कार्यक्रमानंतर अनुभवायला मिळाला आहे.
ज्ञान प्रबोधिनी चिपळूण उपक्रम केंद्रामार्फत आयोजित केलेल्या या विद्याव्रत उपक्रमसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल आणि विद्याव्रतार्थी होता येईल. मुंबई गोवा महामार्गावरील बांधकाम भवनाच्या शेजारी असलेले ज्ञानप्रबोधिनी चे चिपळूण उपक्रम केंद्र कार्यालय मध्यवर्ती ठेवून या विद्याव्रत उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्याव्रत उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहभाग आणि सहयोग शुल्क मात्र बाराशे रुपये आहे.
डिसेंबर ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत रविवारी होणारी ०६ मार्गदर्शन सत्रे, दोन दिवसीय शिबिर आणि प्रत्यक्ष विद्याव्रत संस्कार कार्यक्रम असे या उपक्रमाचे एकूण साधारण स्वरूप असेल. प्रत्यक्ष विद्याव्रत संस्कार हा पालकांच्या समवेत होमकुंडातील अग्नीला साक्षी ठेवून संपन्न. एका पवित्र वातावरणात हा सोहळा संपन्न होतो.
ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी 7058144573, 9421929074, 7276460665 या क्रमांकावर करावी.





