रत्नागिरीच्या संकेता सावंत यांची राज्य स्पर्धेसाठी पंचपदी निवड

रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित ३५ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर क्योरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि ११ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2025 26 ही ५ ते ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड, लातूर येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात चालणाऱ्या ईगल तायक्वांदो अकॅडमीमध्ये संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या खेळाच प्रशिक्षण घेत असून स्पर्धेमध्ये सुयश मिळवत आहेत.
राज्य स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तसंच ईगल तायक्वांदो अकॅडमीचा पालक वर्ग यांच्याकडून संकेता संदेश सावंत यांची राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.





