रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्र.१० मधील दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र.10 (जागा 10 अ व 10 ब) मधील सदस्य पदांकरिता दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर २०२५ असणार आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील आदेश क्र. रानिआ-२०२५/सुनिका/
नप/प्र.क्र.१४/का-६ दि.२९ नोव्हेंबर २०२५ व महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ यातील नियम ४ आणि ५ व इतर सर्व अनुषंगिक तरतुदीप्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी अनुसूचीच्या अनुक्रमांक १ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मतदार प्रभागातून रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात पुढील नेमणुका व तारखा निश्चित करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
प्रभाग क्रमांक १० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्य पदांकरिता सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तर अपर तहसिलदार, शेतजमीन व न्यायाधिकरण, रत्नागिरी आणि निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशन मागे घेण्याचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, रत्नागिरी नगरपरिषद कार्यालय, रत्नागिरी असणार आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक ११ डिसेंबर २०२५ आहे. आवश्यक असल्याचा मतदानाचा दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता पासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून असणार आहे. मतमोजणीचे ठिकाण संत गाडगेबाबा सभागृह, रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्याचा दि. २३ डिसेंबर २०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.





