प्रा. योगेश हळदवणेकर प्रहार जनशक्ती पक्षाच्या रत्नागिरी तालुका प्रमुखपदी
रत्नागिरी : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी पक्षात नवीन नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांनी आज रत्नागिरी तालुक्यातील नेतृत्वाची धुरा योगेश यशवंत हळदवणेकर यांच्या हाती सोपवली आहे. पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा काजल परेश नाईक यांच्या स्वाक्षरीत निवड पत्रानुसार हळदवणेकर यांची अधिकृत तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
भारतीय संविधानातील मूल्ये—समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही व सामाजिक न्याय—ही भूमिका कायम ठेवत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाच्या निवड पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हळदवणेकर यांनी आतापर्यंत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य हीच त्यांच्या नियुक्तीमागील मोठी प्रेरणा ठरली आहे. पुढील काळात ते पक्षाच्या विचारसरणीला बळ देत विविध विकास उपक्रमांना चालना देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे रत्नागिरी तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत होणार असून स्थानिक जनतेशी थेट संवाद साधून विकासात्मक प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल.
“ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे लढत राहीन. गोरगरीब, पीडित, वंचित, दिव्यांग, अनाथ यांच्या सेवेत तत्पर राहून तालुक्यातील सर्व स्तराची मोट बांधण्यात येईल. ही नेमणूक माझ्यासाठी सन्मानासह मोठी जबाबदारी आहे. रत्नागिरी तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या आवाजासाठी मी सज्ज आहे.”
प्रा. योगेश हळदवणेकर.




