महाराष्ट्र

गुरुकुल शिक्षण सेवेचा यशस्वी प्रयोग करणारे दापोलीचे नवभारत छात्रालय !

– जे. डी. पराडकर, jdparadkar@gmail.com

पूर्वीच्या काळी असणारी गुरुकुल पध्दत आजही अनुसरून रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात कुणबी सेवा संघ दापोली तर्फे चालविण्यात येणारे नवभारत छात्रालय म्हणजे शिक्षण सेवाव्रतातील एक अभिनंदनीय आणि यशस्वी असा प्रयोग म्हटला पाहिजे. गेल्या ७५ वर्षात या छात्रालयातून ३४६१ एवढे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. येथील आगळ्या वेगळ्या शिक्षण पध्दती आणि संस्कारांमुळे विद्यार्थ्यांची जडणघडण उत्तम झाली. यातील बरचसे विद्यार्थी शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून कार्य करुन त्यांनी मोठा नावलौकिक मिळविला. आजही नवभारत छात्रालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत असल्याचा छात्रालयाला मोठा अभिमान वाटत आहे.

या संस्थेतर्फे छात्रालयाबरोबरच अन्य व्यावसायिक उपक्रम चालविले जातात . यामधून ग्रामीण भागातील शेतकरी , महिला आर्थिक सक्षम होत आहेत. छात्रांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेतर्फे कृषी केंद्र नवभारत छात्रालय , व्यवसाय शिक्षण विद्यालय, लोकनेते कै. शामराव पेजे कृषी विकास प्रकल्प, बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्र असे विविध उपक्रम कुणबी सेवा संघ दापोलीच्या वतीने यशस्वीपणे सुरु आहेत.

स्वातंत्र्य चळवळीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणारे अप्पासाहेब पटवर्धन यांनी राजकीय चळवळीला विधायक कार्याचे अधिष्ठान दिले. यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. त्यापैकी जिल्ह्यात लोकसंख्येनुसार सर्वात मोठ्या आणि अतिशय मागास अशा कुणबी आणि तत्सम समाजांच्या शैक्षणिक – सामाजिक उन्नतीसाठी कुणबी सेवा संघ, लांजा या संस्थेची स्थापना हा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम होता. या संस्थेमार्फत १९४४ सालापासून लांजा येथे काळे छात्रालय आणि १९४७ पासून दापोली येथे नवभारत छात्रालय सुरु करण्यात आले. अप्पासाहेबांना, द. सी. सामंत गुरुजी, नानासाहेब वंजारे असे ध्येयवादी आणि समर्पित भावनेने काम करणारे सहकारी लाभल्यामुळे या छात्रालयांनी कुणबी व तत्सम मागास समाजांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा बहुविध क्षेत्रात नेतृत्व देणाऱ्या अनेक व्यक्ती या छात्रालयांमधून निर्माण झाल्या.

दापोली येथे नवभारत छात्रालयाची स्थापना १९४७ साली करुन सामंत गुरुजींनी तन मन धन अर्पून या छात्रालयाचे सुमारे १९ वर्षे संगोपन केले त्यामुळे छात्रालयाची विशेष प्रगती झाली . त्यांच्या पश्चात १९६६ सालापासून त्यांचे प्रथम शिष्य पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी यांनी आपल्या गुरुंचा मागोवा घेत २००७ पर्यंत छात्रालयाच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच आर्थिक स्वावलंबनही प्राप्त करुन दिले. अप्पासाहेब आणि सामंत गुरुजी यांच्या पश्चात शामराव पेजे यांना लांजा आणि दापोली हे २०० किमींचे अंतर आणि मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन नवभारत छात्रालय आणि सामंत गुरुजी कन्या छात्रालय यांच्या संचलनासाठी १२ जानेवारी १९८६ रोजी कुणबी सेवा संघ दापोली ही संस्था त्यांनी स्थापन केली.

सन २००५ सालापासून कुणबी सेवा संघ दापोलीच्या उपक्रमांमध्ये नवभारत छात्रालय दापोली , सामंत गुरुजी कन्या छात्रालय, दापोली, कृषी केंद्र नवभारत छात्रालय या तीन उपक्रमांची भर पडली. दहावी बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण विद्यालय आणि संस्थेचा आर्थिक पाया भक्कम व्हावा तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी फळबाग व्यवस्थापन केंद्र शामराव पेजे कृषी विकास प्रकल्प यानावाने कोळबांद्रे येथे सुरु करण्यात आला. शेतीविषयक मार्गदर्शनासाठी नवभारत छात्रालय परिवार हा उपक्रम सुरु करण्यात आला . महिला उद्योजकांना फळप्रक्रिया प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. नवभारत छात्रालय परिवारातर्फे शिक्षण आरोग्य, व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागृती , फलोद्यान, वनशेती, वनौषधी, कृषी उद्योग, ग्रामीण कुटिरुद्योग, आपदग्रस्तांना मदत, चर्चासत्रे शिबीरे मेळावे, विविध प्रकारची प्रशिक्षणे, भाजीपाला बियाणे वाटप, वनझाडे फळझाडे वाटप, उपसा जलसिंचन मार्गदर्शन, शेतीसाठी कर्जप्रकरण मार्गदर्शन, कृषीविषयक सहली असे विविध उपक्रम सतत राबविले जात आहेत.

समाजात आपल्या विशेष कर्तृत्त्वामुळे आपले वेगळे स्थान निर्माण करण्याऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार सुरु करण्यात आला . दापोलीच्या कुणबी सेवा संघ या संस्थेचे नवभारत छात्रालय असो अथवा अन्य उपक्रम गेली ७५ वर्षे हे सारे गुरुकुल पध्दतीने सुरु असल्याने येथे शिस्त, अध्ययन, संस्कार हे सारे पहायला मिळते. याचे यश म्हणजे येथून बाहेर पडणारे विद्यार्थी पुढे कर्तृत्ववान नागरिक बनत आहेत आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button