देवरुखनजीक सिनिअर सिटीझन होम’चे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन
आमदार शेखर निकम यांची उपस्थिती
विघ्रवली माळवाडी येथे पालकर दाम्पत्याने ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन : आ. शेखर निकम
संगमेश्वर : तालुक्यातील देवरूखनजीकच्या विघ्रवली माळवाडी येथे पालकर फाऊंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजय भालचंद्र पालकर यांनी सिनिअर सिटीझन होमची (वृध्दाश्रम) उभारणी केली आहे. या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत व संगमेश्वर-चिपळुणचे आमदार श्री. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वयोवृद्धांची राहण्याची उत्तम सोय, शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार, प्रशिक्षित काळजीवाहू कर्मचारी वर्ग, आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका सेवेसह, निसर्गाच्या सानिध्यात 18 खोल्यांचे प्रशस्त संकुल अशा सेवा या सिनिअर सिटीझन होमद्वारे दिल्या जाणार आहेत. वृध्द आजी-आजोबांसाठी वाचनालय, मनोरंजन, योगाभ्यास, लिप्ट अशा सोयी सुविधांयुक्त हे सिनिअर सिटीझन होम आहे हा चांगला उपक्रम पालकर फाऊंडेशने राबवला आहे, असे आमदार शेखर निकम यांनी उद्घाटना वेळी बोलताना सांगितले.
आ. शेखर निकम म्हणाले की, मनात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असेल तर मेहनतीच्या जोरावर ते साध्य करता येते. हे आपल्या कृतीतून सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजय पालकर व सौ. भारती पालकर या दाम्पत्याने दाखवून दिले. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नजीकच्या विघ्रवली माळवाडी येथील तब्बल 12 एकर जागेतील ओसाड माळरानावर पालकर दांपत्याने नंदनवन फुलवले आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा असाच आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजय पालकर यांनी देवरुख नजीकच्या माळवाडी येथे तब्बल १२ एकर जमीन खरेदी करून त्या जागेवर सेंद्रीय शेती करून अक्षरशः नंदनवन फुलवले आहे. या जागेवरील ओसाड माळरानावर असलेल्या पडीक चिरेखाणींचा सदुपयोग करत या चिरेखाणींमध्ये सिमेंट काँक्रीटची भिंत उभारून शेततळे उभारले आहे. या शेततळ्यांमध्ये पालू जातीच्या माशांची पैदास केली जात आहे. त्याचबरोबर येथील माळावर श्री. पालकर यांनी ऊस लागवड, कॉफी आदी पिकांची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वीही झाला आहे. काळीमिरी व हळदीचे उत्पादनही ते घेत आहेत. शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन हे व्यवसायही त्यांनी या माळरानावर सुरू केले आहेत. त्यांचे हे कार्य तरूणांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, विजय पालकर, भारती पालकर, राहूल पालकर, राहूल पंडीत, प्रमोद पवार, श्रद्धा गुरव, बाबू साळवी, पदाधिकारी व ग्रामस्थ इ. उपस्थित होते