संतोष कानडे म्हणजे भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा सक्षम दुवा : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला असून, योग्य माणूस योग्य ठिकाणी असला की संस्था कशी कार्यक्षम होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले की, भजनी कलाकार आणि वारकरी संप्रदायाला सरकारशी जोडणारा दुवा म्हणून संतोष कानडे सातत्याने प्रयत्नशील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांसाठी सरकारकडून जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रत्येक अधिवेशनात मुद्दे मांडले असून, असे एकही अधिवेशन नाही की त्यांनी कलाकारांसाठी मागण्या मांडल्या नाहीत.

सरकार भरभरून मदत देऊ शकते, मात्र त्या गरजांची योग्य जाणीव करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील इतर कलांप्रमाणेच कोकणातील समृद्ध भजन परंपरा व सांस्कृतिक वारशाकडेही सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारला अजून चार वर्षांचा कालावधी शिल्लक असून, या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना व सुविधा मिळवण्यावर भर दिला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राला न्याय देणारी आणि काम करणारी माणसे सध्या सत्तेत आहेत. विरोधकांकडून काम थांबवण्याचा अडथळा नाही, त्यामुळे आपण काय घडवू शकतो याचा अभ्यास करून पुढे गेले पाहिजे, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.
कोकणातीलच सांस्कृतिक मंत्री आणि मंत्रिमंडळातील माझी जिद्द व इच्छाशक्ती यामुळे भजनी कलाकार संस्थेला न्याय देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह. भ. प. गावंडळकर महाराज, भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





